
नांदेड – नांदेड महापालिकेने शहरात सुरू केलेल्या नालेसफाईच्या कामाची महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे हे शुक्रवारी पाहणी करणार आहेत. दरम्यान महापालिकेच्या वतीने सुरू असलेली ही नालेसफाई अद्याप ५० टक्केही झाली नाही. तर नालेसफाईसाठी महापालिकेने नियुक्त केलेले अतिरिक्त मजूर कागदावरच असल्याची गंभीर बाबही पुढे आली आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात नांदेड शहरात पुन्हा एकदा सखल भागाला नियोजनाच्या अभावाचा फटका सहन करावा लागणार आहे.
नांदेड शहरात आर. अँड. बी या खाजगी ठेकेदाराकडून शहर स्वच्छतेची कामे करून घेतली जातात. मात्र ही कामे करून घेताना महापालिकेचे अधिकारी आपले हात कसे ओले होतील याकडेच वर्षभर लक्ष ठेवत असतात. दुसरीकडे आर. अँड बी. ही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आपल्या अखत्यारित ठेवत कामकाज पाहत आहे. महापालिकेने पावसाळापूर्व कामासाठी मोठी यंत्रणा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. ही यंत्रणा किती काम करते यासाठी जीपीएसही लावण्यात आले आहेत. पण त्याचवेळी महापालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिलेले अतिरिक्त मजूर मात्र कागदावरच आहेत. यातून जादा देयकाचा नियमित फंडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून राबविला जात आहे. हा फंडा प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अवलंबिण्यात आला आहे.
नांदेड शहरात १२ मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात धांदल उडाली होती. शहरातील विविध भागात घंटागाडी आणि स्वच्छता कर्मचारीत जात नसल्याने नागरिकांनी रस्त्यावर फेकलेला कचरा नालीमध्ये जमा झाला. त्याचा फटका केवळ एक ते दीड तास झालेल्या पावसाने संपूर्ण शहराला बसला होता. शहरातील वेगवेगळ्या भागात प्रमुख रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.
महापालिका आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी पावसाळापूर्वक कामाचा आढावा घेताना कामाची संथगती पाहता प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयांना स्वतंत्र मशिनरी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी एक पोकलेन मशीन, एक जेसीबी तसेच एक टिप्पर देण्यात आला आहे. नांदेड शहरात मोठ्या नाल्यांची संख्या ८९ इतकी आहे तर पोकलेनद्वारे साफ करावयाच्या नाल्यांची संख्या ३२ आहे. शहरात १८४ नाले मनुष्यबळाच्या आधारे स्वच्छ केले जाणार आहेत. प्रत्येक झोनला यासाठी २० अतिरिक्त मजूरही देण्यात आले आहेत. मात्र हे मजूर नेमके कुठे काम करत आहेत याचा थांगपत्ता कुणालाही लागला नाही. अनेक प्रभागात नाल्या तुंबलेल्याच आहेत. हे अतिरिक्त कर्मचारी अद्याप प्रभागात, वार्डात पोहोचलेच नाहीत. त्यामुळे पावसाळयापूर्वी ही स्वच्छता पूर्ण होईल की नाही याची चिंता शहरवासीयांना लागली आहे.
दुसरीकडे शहरात रस्ते उंच आणि घर खाली अशी अनेक भागांमध्ये परिस्थिती उद्भवली आहे. पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी थेट घरात शिरण्याची भीती अनेक भागातील नागरिक व्यक्त करत आहेत. यावर महापालिका आता नेमका काय तोडगा काढते याकडेही लक्ष लागले आहे. नांदेड शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १४ रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे काही ठिकाणी पूर्ण झाले असली तरीही अनेक ठिकाणी नाल्यांची जोडणी झाली नाही त्यामुळे त्या त्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे.