Police

नांदेड जिल्ह्यात २३ गुन्हेगारी टोळ्यातील ७० जण हद्दपार तर १४ स्थानबद्ध 

एमपीडीए अंतर्गत कारवाईचे ३० तर हद्दपारीचे १७९ प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर

नांदेड – नांदेड जिल्ह्यात वारंवार गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार, लपून छपून अवैध धंदे करणाऱ्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ७० जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायदा अर्थात एमपीडीए अंतर्गत १४ आरोपींना तुरुंगातच स्थानबद्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यात एमपीडीए अंतर्गत ३० प्रस्ताव तर हद्दपारीचे १७९ जिल्ह्यातील विविध मार्फत प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

जिल्ह्यात गुन्हे करणाऱ्यावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनसुद्धा त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याची बाब पुढे आली. नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांकडून त्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यासंदर्भाने संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायदा अर्थात एमपीडीए अंतर्गत कारवाईचे ३० प्रस्ताव पाठवण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमान्वये १७९ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्या प्रस्तावावर कारवाई सुरूच आहे.

अर्धापूर पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये सुरेंद्रसिंग उर्फ सुरज जगतसिंग गाडीवाले वय २२, रा. नंदिग्राम सोसायटी नांदेड, जसप्रीतसिंग उर्फ यश गेंदासिंग कामठेकर वय २३, रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड, शुभम राजकुमार खेलगुडे वय २४, रा. बंदाघाट नांदेड , शरणपालसिंग गुरमीतसिंग रागी वय २६, रा. गुरुद्वारा गेट नंबर ४ आणि जसलोकसिंग नवनिहालसिंग कारीगीर वय २०, रा. यात्रीनिवास नांदेड या पाच जणांना एक वर्ष कालावधीसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतचे  आदेश व पोलीस ठाणे विमानतळ यांच्याकडून कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये पाठविण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये गुरप्रितसिंग गुलजारसिंग खेरा वय ४४, रा. दशमेशनगर बाफना रोड नांदेड, करणसिंग राजवीरसिंग शाहू वय ३२, रा. गुरुद्वारा गेट नंबर तीन, सरहान अली अलकेरी वय ४४, रा. अरबगल्ली दरबार मज्जिदजवळ इतवारा नांदेड यांना सहा महिने कालावधीसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतचे आदेश रोजी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत.

नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारांच्या टोळ्या करून गुन्हे करणाऱ्या इसमाविरुद्ध कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये पोलीस ठाण्याकडून पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यातील २३ टोळ्यांमधील ७० इसमांना नांदेड जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायदा अर्थात एमपीडीए अंतर्गत १४ आरोपींना कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील टोळीने गुन्हे करणाऱ्या विरुद्ध प्रस्ताव पाठवून त्यांना हद्दपार तसेच स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया सुरूच असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!