
नांदेड – किनवट शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबाडी येथे मिस्त्री काम करणाऱ्या एका तरुणाचा फावड्याने डोक्यात मारून खुन केला. यावेळी वाद सोडविण्यासाठी आलेली एक महिलाही गंभीर जखमी झाल्याची घटना २९ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर किनवट शहरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, आरोपीस पकडण्यात आल्यानंतर तणावाची परिस्थिती निवळली आहे.
अंबाडी येथे २९ मे रोजी वसीम शेख महेबूब खुरेशी वय २२ वर्षे रा. इस्लामपूरा किनवट हा उत्तम भरणे यांच्या घराचे बांधकाम चालू असल्याने त्यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी गेला होता. त्या दोघांमध्ये पाणी मागण्याच्या कारणावरुन बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले. यामध्ये उत्तम गणपत भरणे वय ५२ वर्षे याने वसीम शेखच्या डोक्यात, पोटावर फावडयाने जबर मारहाण केली. या मारहाणीत वसीम शेख जागीच गतप्राण झाला. हा वाद होत असताना शेजारी राहणाऱ्या विशाखा भारत मुनेश्वर वय ५३ वर्षे या वाद सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही भरणे याने फावडयाने मारून गंभीर जखमी केले. विशाखा भरणे यांना उपचारासाठी तेलंगाणा राज्यातील अदिलाबाद येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान घटनेची माहिती मयताच्या नातेवाईकांना समजताच उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणलेले मयताचे प्रेत घेवून नातेवाईकांनी थेट किनवट पोलिस स्टेशन गाठले. यावेळी मोठा जमाव झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता किनवट ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी घटनेतील आरोपी उत्तम भरणे याला तरीच ताब्यात घेतले. तसेच जमावास शांत केले. नातेवाईकांना समजावून सांगत किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रेत हलवण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे किनवट येथे पोहोचले. किनवटमध्ये अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनीही घटनेची माहिती घेत तपासाच्या अनुषंगाने आवश्यकता सूचना दिल्या आहेत. त्याचवेळी नागरिकांनीही कोणत्याही अफवा न पसरविता शांतता राखावी असे आवाहन केले आहे. किनवटमध्ये पूर्णतः शांतता असल्याचे त्यांनी सांगितले.