
नांदेड – नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. नांदेड शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्हाभरातही एकूणच पूर परिस्थिती पाहता नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुन्हा एकदा बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण केले आहे. लष्कराची ही तुकडी लवकरच नांदेडमध्ये पोहोचणार आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदी पात्रात ८८ हजार १४३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
हवामान विभागाने नांदेड जिल्ह्याला २९ ऑगस्ट रोजी येलो अलर्ट दिला आहे. पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका प्रामुख्याने नांदेड शहराला बसल्याचे सध्यातरी चित्र आहे नांदेड शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. वसंतनगर, बाबानगर, मगनपुरा, राजर्षी शाहूनगर, नवा मोंढा भागात अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. विनायकनगर आणि दत्तनगर शारदानगर येथेही घरामध्ये पाणी शिरले आहे. नवीन नांदेडतील सिडको, वसरणी, कौठा या भागातही अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. जुन्या नांदेडातील गंगानगर, लूंबिनी नगर, विणकर कॉलनी, शिवनगर नाल्यालगत असलेल्या घरामध्ये पाणी शिरले आहे. नांदेड शहर आणि जिल्हाभरात सुरू असलेल्या या पावसाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांना आज शुक्रवारी सुट्टी घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.
नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सर्व वार्ड ऑफिसर, आपत्ती व्यवस्थापन पथक व त्यांचे कर्मचारी फिल्डवर राहतील असे आदेश दिले आहेत. आवश्यक्तेनुसार स्थलांतर करण्याचे नियोजन केले आहे. अतिवृष्टीमध्ये कामाचे योग्य नियोजन, समन्वय व अंमलबजावणी करण्यासाठी झोननिहाय उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची आयुक्त डोईफोडे यांनी नियुक्ती केली आहे. त्यामध्ये झोन क्र ३ साठी निलेश सुंकेवार ९८६०८७२३२० झोन क्र. ४ साठी अजितपालसिंघ संधू ९०११०००९६५, झोन ५ साठी सुमंत पाटील ९७६७१७५९९९, आणि झोन १,२ व ६ साठी विकास गाढवे ९७६४२३०६२८ यांची नियुक्ती केली आहे. हे सर्व अधिकाऱ्यांनी त्या त्या झोनमध्ये आवश्यकता सर्व उपाययोजना तात्काळ करण्याचेही आदेश दिले आहेत. नांदेड शहरातील काही भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातही पूर परिस्थिती चिंताजनकच आहे. मन्याड नदी पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने मनसकर्गा, मानूर, नंदुर, शेवाळा गावालगत पाणी आल्याने नंदुर गावचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणचे ग्रामस्थ उंचावर असल्याने सुरक्षित असल्याचे कळविण्यात आले आहे. लोहा- गंगाखेड हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोहा तालुक्यातील सुनेगाव (कुत्र्याचे) या गावाला पुराच्या पाण्याचा वेढा आहे. त्यामुळे गावातील नागरिक अडकून पडले आहेत. त्यांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी तातडीने बचाव कार्यासाठी मदत पाठवली आहे.
जिल्ह्यात गोदावरी, मांजरा, मन्याड, लेंडी, पैनगंगा यासह इतर लहान मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बहुतांश नद्यांना पूर आला आहे. गोदावरी नदीचे पाणी ओसरण्यासाठी तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणातून ५ लाख क्युसेक विसर्ग करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे तेलंगणा राज्य सरकारच्या संपर्कात असून पूर परिस्थितीत समन्वय ठेवून आहेत. त्याचवेळी तेलंगणा राज्यातील निजामसागरचे विसर्ग ५३ हजार क्युसेसने कमी केला आहे. त्यामळे मांजरा नदीची पूर परिस्तिथी काही काळात नियंत्रित होईल, अशी अपेक्षा आहे.



