हवामान

नांदेड जिल्ह्यात दीड हजार नागरिक पुरामध्ये अडकले, उमरी रेल्वे स्टेशनचे अधीक्षक पुरात बुडाले

एसडीआरएफ, सीआरपीएफ, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकीय यंत्रणांकडून बचाव कार्य सुरू, नांदेड जिल्ह्यातील ९३ पैकी ६९ महसूल मंडळात अतिवृष्टी, पालकमंत्री सावे संध्याकाळी नांदेड जिल्ह्यात येणार

नांदेड – नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी, मांजरा, मानार, लेंडी, आसना या नद्यांना पूर आला असून पुरामध्ये १५०० नागरिक अडकले आहेत. जिल्ह्यात ५ हजाराहून अधिक नागरिकांचा सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत. बचाव कार्यासाठी लष्करी तुकडीलाही पाचारण करण्यात आले आहे. सध्या एसडीआरएफ, सीआरपीएफ, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या सर्व यंत्रणा कार्यरत आहेत जिल्ह्यातील ९३ महसूल मंडळापैकी ५९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामध्ये कंधार आणि माळाकोळी महसूल या दोन मंडळात प्रत्येकी तब्बल २८४.५० मिलिमीटर पाऊस २४ तासात नोंदवला आहे. उमरी रेल्वे स्टेशनचे अधीक्षक ओम प्रकाश मीना हे कर्तव्य बजावून रेल्वे क्वार्टर येथे परतत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची गंभीर घटना पुढे आली आहे.
उमरी रेल्वे स्टेशन अधीक्षक ओम प्रकाश मीना वय ५१ वर्ष ( रा. जिल्हा अलवर राजस्थान) हे सध्या रेल्वे क्वार्टर उमरी येथे राहत होते. उमरी रेल्वे स्थानकावरून ते कर्तव्यावरून घरी परत येत असताना रेल्वे अंडर ब्रिज बोळसा बुद्रुक तालुका उमरी येथे पुराच्या पाण्याच्या प्रवाहात घसरून पडून मयत झाले आहेत.
नांदेड तालुक्यातील सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बिलोली, कंधार, लोहा तालुक्यातील प्रत्येकी ६, मुखेड ८, नायगाव, हदगाव तालुक्यात प्रत्येकी ५, भोकर, धर्माबाद, उमरी तालुक्यात प्रत्येकी ४, अर्धापूर, मुदखेड तालुक्यात प्रत्येकी ३ आणि किनवट आणि हिमायतनगर तालुक्यातील एका महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात २४ तासात सरासरी १३२.७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी ८८.३२ टक्के इतकी झाली आहे. दरम्यान, नांदेड येथील विष्णूपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. १ लाख २९ हजार ७४३ क्युसेस वेगाने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे नवीन आणि जुन्या नांदेडला जोडणारा नावघाट पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तेलंगणा राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निजामसागर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे शेळगाव जुने, मेदनकलूर, सांगवी उमर, तमलूर या गावात गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. तर शेवाळा येथे आणखी २०० नागरिक अडकून पडले आहेत.
नायगाव तालुक्यातील सुगाव आणि सोमठाणा येथील तलाव पूर्ण भरलेले आहेत. लिंबोटी धरणातून सोडण्यात आलेले पाणी रातोळी स्थित मन्याड नदीवरील पुलावरून जवळपास दीड फूट वाहत आहे. कुंचेली येथील जुन्या गावातील अंदाजे १०० लोक अनेक वेळा सूचना देऊनही नवीन गावात आले नाहीत. रात्री रस्त्यावर पाणी वाढून जुन्या गावात शिरले आहे. सीआरपीएफच्या पथकाद्वारे त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. कंधार तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी भिंत कोसळल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र कोणतीही हानी झाली नाही. कवठा- बारूळ रोड पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. भूकमारी येथील गरोदर महिला मनीषा नारायण गवाले यांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बोळका येथील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. मुदखेड तालुक्यातील शेंबोली येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. लोहा तालुक्यात १३ जनावरे बेपत्ता आहेत. वाका येथे पुलावरून पाणी वाहत आहे. पांगरी येथील नदीला पूर आल्याने पेनुर – लोहा रस्ता बंद झाला. भाद्रा येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरामुळे संपर्क तुटला आहे. बिलोली तालुक्यातील हरणाळी गावात पुराचे पाणी शिरले आहे. आता ते हळूहळू कमी होत आहे. चिटमोगरा आणि आळंदी या दोन्ही गावांचा नदीच्या पाण्यामुळे सर्व बाजूने संपर्क तुटला आहे. नांदेड तालुक्यात पहाटे चार वाजेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरले. सिडको रस्ता बंद झाला होता. पासदगाव येथील आसना नदीवरील पूल सद्यस्थितीत चालू आहे परंतु तो लवकरच बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. फतेपुर गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. मुखेड तालुक्यात पुराचे थैमान अजूनही सुरूच आहे शुक्रवारी झालेल्या पावसाने २२ पशुधन वाहून गेले आहेत. दीडशेहून अधिक घरे घरांचे नुकसान झाले आहे. ३०० कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. हिमायतनगर तालुक्यात वीज कोसळल्याने गजानन विठ्ठल मिराशे आणि प्रभाताई रघुनाथ मिराशे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धर्माबाद ते संगम जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे धर्माबाद ते सीरजखोड रस्ता बंद झाला आहे. भोकर तालुक्यातील नांदा म.प. येथील ४५ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. चिदगिरीअंतर्गत रामू नाईक तांडा येथील वनविभागाचे वनतळे फुटल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अर्धापूर तालुक्यात रोडगी येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. पुलावरून पाणी वाहत आहे रोडगी- पांगरी रस्ता बंद झाला आहे.

दरम्यान नांदेड जिल्ह्यात उद्भवलेली पूर परिस्थिती लक्षात घेता पालकमंत्री अतुल सावे हे तातडीने नांदेड दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी सहा वाजेदरम्यान त्यांचे नांदेड शहरात आगमन होणार असून ते विविध पूरग्रस्त भागांना भेटी देणार आहेत.

नांदेड शहरात महापालिकेच्या अग्निशमन दल पथकाने ५० हून अधिक नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका केली आहे. शहरातील बहुतांश भागातील घरामध्ये पाणी शिरले आहे. या परिस्थितीत नागरिकांना बचाव करण्यासाठी महापालिका ठिकठिकाणी कार्यरत आहे. शहरात अनेक ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. काही भागात स्थलांतर करण्यातही आले आहे. या नागरिकांना महापालिका तसेच नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वाराच्या वतीने जेवणाची सोय करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे प्रमुख केरोजी दासरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे पथक ठिकठिकाणी बचावकार्य करण्यासाठी पुढे सरसावले आहे. नांदेड शहरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनीही वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला. पूर परिस्थितीत नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये,  सेल्फीसाठी आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहनही अबिनाश कुमार यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!