हवामान

नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती गंभीर..!

गोदावरीसह मानार, लेंडी, मांजरा आदी नद्यांना पूर, देगलूर तालुक्यात अडीच हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले,  विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले, मानारही शंभर टक्के भरले, बचाव कार्याला वेग

नांदेड – नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार, देगलूर, नायगाव, लोहा या तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून नांदेड – हैदराबाद, नरसी- बिलोली, मुखेड तालुक्यातील अनेक रस्ते बंद पडले आहेत. जिल्ह्यात गोदावरी, मानार, लेंडी, मांजरा या नद्यांना पूर आला असून शेती पिकांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पशुधनाचीही अनेक ठिकाणी हानी झाली आहे. देगलूर तालुक्यात दीड हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मुखेड, नरसी, धर्माबाद या शहरांमध्येही पाणी शिरले आहे. देगलूर येथे एसडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली असून मुदखेड येथील सीआरपीएफ जवानांची बचाव कार्यासाठी मदत घेतली जात आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासापासून पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार, नायगाव या चार तालुक्यात १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील गोदावरी, मांजरा, लेंडी या नद्यांच्या पाणी पतळीत वाढ झाली आहे. या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नायगाव तालुक्यातील नरसी गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. देगलूर – उदगीर रस्ता बंद झाला आहे. बिलोली- नरसी रस्ताही बंद झाला आहे. गोदमगाव, परडवाडी कोलंबी कहाळापुर या नायगाव तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरले आहे. चिखली, येलूर, दहीकळंबा, सावळेश्वर, चिखली या कंधार तालुक्यातील गावामध्ये पाणी आले आहे. कापशी खुर्द, ता. लोहा या गावात पाणी आले असून उमरा गावही पाण्याखाली गेले आहे. बिलोली तालुक्यातील येसगी येथील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासापासून तेलंगणा राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी निजामसागर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे शेळगाव, जुने मेदनकल्लूर, सांगवी उमर, तमलुर या गावात पाणी आले आहे. प्रशासनाने या चारही गावातील सुमारे दीड हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असून खबरदारीच्या उपायोजना म्हणून नांदेड येथून एसडीआरएफची तुकडी देगलूर येथे रात्रीच पाठवण्यात आली आहे. नायगाव तालुक्यात बचाव कार्यासाठी मुदखेड येथील सीआरपीएफ केंद्रातील जवानांचीही मदत घेतली जात आहे.

सद्यस्थितीत विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे, उर्ध्व मानार धरणाचे १५ दरवाजे प्रत्येकी १.५ मीटर उघडण्यात आले आहेत. ७८ हजार ५८० क्युसेस वेगाने विसर्ग सुरू आहे. निम्न मानार प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये होत असलेल्या सततच्या पावसामुळे एकत्रित एकूण ७९ हजार २७० क्युसेस एवढा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. आगामी पावसाचा अंदाज लक्षात घेता उर्ध्व मानार व निम्न मानार प्रकल्पांचा एकत्रित विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, इसापूर, निजामसागर, श्रीरामसागर धरणातून करण्यात आलेल्या अतिरिक्त पाण्याच्या विसर्गामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व धरणे आणि बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जायकवाडी धरणातून ३७ हजार ७२८ क्युसेस वेगाने गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. तर दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातूनही ३५ हजार ५१, विष्णुपुरी धरणातून ३९ हजार ३४० क्युसेस, बळेगाव बंधाऱ्यातून ९७ हजार ७०२ क्युसेस आणि तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणातून अडीच लाख क्युसेस वेगाने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. येलदरी धरणातून ६ हजार ९२० क्युसेस, ईसापुर धरणातून ३ हजार ३६८ आणि निजामसागर धरणातून २ लाख २० हजार २५६ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नायगाव तालुक्यातील नरसी शहरात पाणी शिरले आहे.  नांदेड हैदराबाद महामार्गावर वाका येथे पाणी वाहत आह. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी स्थानिक शोध व बचाव पथक, नांदेड महापालिकेचे शोध व बचाव पथक यासह मुदखेड येथील सीआरपीएफ जवानांचीही मदत घेतली जात आहे. कंधार तालुक्यातील चौकी महाकाया, गोणार, राऊतखेडा, मंगलसांगवी, बारूळ, भुकमारी, शिरशी बु. चौकी महाकाया गुंडा, बिंडा, दिंडा, तेलूर सावळेश्वर, दहीकळंबा या गावात पाणी शिरले आहे. कंधारेवाडी, जाकापूरचा संपर्क तुटला आहे. जाकापूर गावाला दोन्ही बाजूने पाण्याने वेढले आहे. नांदेड तालुक्यातील किकी – राहेगाव या पुलावरून पाणी वाहत आहे. किनवट आणि हिमायतनगर तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!