
नांदेड – वर्षानुवर्ष निवड श्रेणी न देणे, शासन निर्णयानुसार विनंती बदली प्रक्रिया न राबवणे या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने मंगळवारी जिल्हा परिषदेपुढे एक दिवसीय धरणे आंदोलन केले. शेजारील जिल्ह्यात विनंती बदली प्रक्रिया राबवली जात असताना नांदेड जिल्ह्यात ती का राबवली जात नाही असा सवालही राज्यशिक्षक सेनेच्या वतीने यावेळी करण्यात आला.
शिक्षकांची विनंती बदली प्रक्रिया राबवावी असे शासनादेश असतानाही नांदेड जिल्हा परिषद प्रशासनाने आतापर्यंत कोणतीच कार्यवाही केली नाही. इतर जिल्ह्यात पत्र काढून विनंती बदली प्रक्रिया राबवली जात आहे. नांदेडमध्ये ही प्रक्रिया का राबवली जात नाही असा आक्रमक सवाल राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी केला आहे. शिक्षकांप्रती अन्यायकारक भूमिका नांदेड जिल्हा परिषद घेत आहे. या भूमिकेमुळे शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षकांना निवड श्रेणी द्यावी याबाबत शासनाचे वेळोवेळी पत्रक आले आहेत. तरीपण ही प्रक्रिया जिल्ह्यात जवळपास १५ ते १६ वर्षापासून रखडली असल्याचा आरोपही अंबुलगेकर यांनी केला आहे. यातच आता अनेक शिक्षकांना वेतनश्रेणीपासूनही वंचित ठेवण्यात आले आहे. जीपीएफ स्लिप बाबतही प्रशासनाचे धोरण अन्यायकारक आहे. बारा वर्षे झालेल्या शिक्षक बांधवांना वरिष्ठ श्रेणी दिली जाते, ती वर्षानुवर्ष दुरुस्ती कागदपत्र मागवून प्रलंबित ठेवली जात आहे. समायोजन होत नाही, पदोन्नत्या वेळेवर होत नाहीत, विषय शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ नाही अशा अनेक प्रकारात शिक्षकांची मुस्कटदाबी होत आहे. या सर्व प्रकाराविरोधात शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच राज्य शिक्षक सेनेच्या वतीने आंदोलन उभे करून या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या आंदोलनात शिक्षक सेनेचे पदाधिकारी विठ्ठल चव्हाण, जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, रवी बंडेवार, विठ्ठल देशटवाड, श्रीरंग बिरादार, मनोहर भंडेवार, गंगाधर कदम, अविनाश चिद्रावार, बालाजी राजुरवार, गंगाधर ढवळे, शंकर हामंद, बालाजी भांगे, कृष्णा माने, शिवकुमार निलगिरवार, अनिरुद्ध क्षीरसागर, रविराज जाधव, सचिन रामदिनवार, बालाजी लोहगावकर, संजय मोरे, पुंडलिक कारामुंगे, शेख मुस्तफा, गोविंद सुवर्णकार, महिला आघाडीच्या सुकन्या खांडरे, शिवकन्या पटवे, शोभा गिरी, पंचफुला वाघमारे, प्रकाश फुलवरे, प्रकाश कांबळे, आनंदा सूर्यवंशी आदींची यावेळी उपस्थिती होती.
या आंदोलनास शिवसेना नेते दत्ता कोकाटे, प्रकाश मारावार यांनी भेट देऊन शिक्षकांच्या प्रश्नाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. या प्रश्नाकडे जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने पाहावे अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशाराही कोकाटे यांनी यावेळी दिला आहे.