Police

नांदेड पोलीस परिक्षेत्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन ऑल आऊट..!

रविवारी एकाच दिवशी १ हजार ३९ धाबे, हॉटेलची तपासणी, दारू आणि गुटखा असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड – आगामी सण, उत्सव तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्रातील हॉटेल आणि धाब्यावर विनापरवाना देशी-विदेशी दारूची होणारी विक्री तसेच पान टपऱ्या आणि किराणा मालाच्या दुकानातून गुटख्याची होणारी विक्री या विरोधात २७ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी एकाच वेळी ऑल आऊट ऑपरेशन राबविले. या ऑपरेशनमध्ये १ लाख ६७ हजार ४३७ रुपयांची देशी-विदेशी गावठी दारू आणि ३१ हजार ३२५ रुपयांचा गुटखा व सुगंधित पान मसाला असा एकूण १ लाख ९८ हजार ७६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यात रविवारी एकाच वेळी हॉटेल, धाबे, पान टपऱ्या व किराणा दुकाने आदींची तपासणी करण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी नांदेड जिल्ह्यात ५७९ हॉटेल,धाबे तपासले. त्यामध्ये २३ हजार ३०० रुपयांची देशी-विदेशी गावठी दारू आढळली. तर ३ हजार ५८० रुपयांचा गुटखा सापडला आहे. परभणी जिल्ह्यात १०९ धाबे, हॉटेल तपासले. तेथे ३१ हजार ५१२ रुपयांची देशी, विदेशी दारू आढळली. परभणी जिल्ह्यात या कारवाईत एकाही ठिकाणी गुटखा अथवा सुगंधित पान मसाला आढळला नाही हे विशेष.  हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक ६८ हजार ६३० रुपयांची देशी-विदेशी दारू आढळली आहे. तर २४ हजार ५१५ रुपयांचा गुटखा आणि सुगंधित पान मसाला आढळला आहे. या कारवाईत ९९ हॉटेल, धाबे तपासण्यात आले. लातूर जिल्ह्यात २५२ हॉटेल, धाबे तपासण्यात आले. त्या ठिकाणी ४३ हजार ९९५ रुपयांची देशी-विदेशी, गावठी दारू आढळली. तर ३ हजार २३० रुपयांचा गुटखा व सुगंधित पान मसाला आढळला.

या कारवाईत नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि लातूरचे पोलीस अधीक्षक सोमेय मुंडे यांच्यासह संबंधित जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उपाधीक्षक, संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक, अंमलदार, स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी, अंमलदार यांचा समावेश होता.

नागरिकांनीही आपल्या भागातील हॉटेल्स व धाब्यावर विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री तसेच पान टपऱ्या किंवा किराणा मालाच्या दुकानात होणारी गुटख्याची विक्री यांच्यासह अशा मालांच्या पुरवठादारांची माहिती पोलिसांना देऊन या मोहिमेस हातभार लावावा असे आवाहन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात ऑपरेशन फ्लश आऊट गुंडाळले..?नांदेड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी रुजू होतात ‘ऑपरेशन फ्लश आउट’ सुरू केले होते या ऑपरेशन अंतर्गत वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. जवळपास सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल विविध कारवाईमध्ये जप्त करण्यात आला होता. मात्र या कारवाईतील एका पथकाला नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ११ नोव्हेंबर रोजी लोहा येथे वाळू माफियाकडून थेट वसुली करत असताना रंगेहात पकडले. या पथकातील पाचही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश उमाप यांनी दिले होते. त्यामुळे या विशेष मोहिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ही बाब गांभीर्याने घेत जिल्ह्यातील सर्व सहा विशेष पथके बरखास्त करत त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र या नवीन पथकांकडून एका महिन्यात आतापर्यंत मोठी कारवाई मात्र कुठेही झाली नाही. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यात ऑपरेशन फ्लश आऊट गुंडाळल्याचेच स्पष्ट होत आहे. सध्या नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक आणि नऊ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. पोलिसांवर याचा मोठा ताण आहे. पोलीस आणि महसूल यंत्रणा निवडणूक कामात सज्ज असल्याचा फायदा घेत जिल्ह्यात वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका चालक, सीमावर्ती भागातील क्लब चालक, स्वस्त धान्याचा काळाबाजार करणारे पुन्हा एकदा ॲक्टीव झाले आहेत. त्यांचीही दिवाळी जोमात सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!