नांदेड जिल्हा

नांदेडकरांनो जागते रहो… आज बुधवारची रात्रही धोक्याचीच..!

विष्णूपुरी प्रकल्पात २ लाख ८३ हजार क्युसेस पाण्याची आवक तर गोदावरीतही केला जात आहे २ लाख ७५ हजार क्युसेस विसर्ग, जलसंधारण मंत्री संजय राठोड गुरुवारी नांदेड दौऱ्यावर

नांदेड – विष्णूपुरी प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या २ लाख ७५ हजार क्युसेस पाण्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. प्रकल्पात वरील धरणातून २ लाख ८३ हजार क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी प्रकल्पात आलेले पाणी पुढे सोडले जात आहे. जोपर्यंत वरच्या धरणातून पाणी कमी होणार नाही तोपर्यंत गोदावरीचा महापूर ओसरणार नाही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे नांदेडकरांना आजची बुधवारची रात्रही धोक्याची ठरणार आहे. बुधवारी दुपारनंतर गोदावरीची पाणी पातळी वाढतीच राहिली असून रात्रीही अशीच परिस्थिती कायम राहील असे चित्र आहे.

विष्णूपुरी प्रकल्पातून सोमवारपासून पाण्याचा मोठा प्रमाणात विसर्ग केला जात आहे. मंगळवारी हा विसर्ग दीड लाखावरून दोन लाख क्युसेसपर्यंत पोहोचला होता. बुधवारी तो अडीच लाख क्युसेस दुपारपर्यंत आणि त्यानंतर रात्री आता २ लाख ७५ हजार क्युसेसपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी वरचेवर वाढतच आहे. गोदावरी नदीने इशारा पातळी ३५१ मीटर ओलांडून सध्या ३५३ मीटर ही धोका पातळी गाठलेली आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या मनपा हद्दीतील खडकपुरा, दुल्हेशाह रहेमान नगर, जी.एम.कॉलनी, गाडीपुरा, कालापुल परीसर, गंगाचाळ, भिमघाट, नावघाट मल्ली परीसर, बिलाल नगर, पाकीजानगर, शंकर नगर, वसरणी इत्यादी सखल भागातील नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. बाधित नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी सहा क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण १० तात्पुरती निवारा केंद्रे कार्यान्वित केली असून त्यापैकी क्षेत्रिय कार्यालय क्र. ४ अंतर्गत किल्ला येथे २८ ,गांधी राष्ट्रीय विद्यालय गाडीपुरा येथे ४५, नवनिहाल शाळा खडकपुरा येथे १६५ ,मार्कंडेय मंदीर येथे ३६ अशा एकूण २७४ नागरिकांना स्थलांतरित केले आहे. त्या ठिकाणी पिण्याचे पाणी, जेवण, नाश्ता, ग्रीन मॅट व ‍विद्युत व्यवस्था इत्यादीची सोय करण्यात आलेली आहे.

विष्णूपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने विष्णूपुरी धरणातुन अजूनही पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाच्या सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना तसेच वाहनांकरीता यांत्रिकी विभाग, स्वच्छता विभाग व इतर विभाग प्रमुख यांना सदैव सतर्क राहण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत. मनपाच्या अग्निशमन विभाग व विशेष बचाव पथकाससुध्दा आवश्यकतेनुसार बचाव कार्याकरीता सदैव सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन ‍परिस्थितीला तोंड देण्याकरिता महानगरपालिका सदैव सज्ज आहे. शहरातील नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये, तथापि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरुन न जाता तात्काळ महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षातील ०२४६२-२६२६२६, २३०७२१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पाणी गावातील शेतामध्ये शिरले आहे. त्याचवेळी सीमावर्ती भागातील अनेक गावांना गोदावरी नदीच्या पुराचा विशेषत: बॅक वॉटरचा फटका बसला आहे. नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील बॅक वॉटरमुळे पाणीपातळी वाढत आहे. बरबडा ते बरबडा वाडी जाणारा रस्ता बंद झाला आहे. धर्माबाद तालुक्यातील मनूर, संगम सहित इतर नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अर्धापूर तालुक्यातील आसना नदीच्या बॅक वॉटरमुळे देगाव बु. व शेलगावचा रस्ता बंद झाला आहे. लोहा तालुका बेटसांगवी येथे आलेल्या पुराच्या व बॅक वॉटरमुळे बेटसांगवी – शेवडी रस्ता वाहतूक बंद आहे

दुसरीकडे चिंता वाढवणारी आणखी एक बातमी पुढे आली आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक २५ व २६ सप्टेंबर या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. तर २७ सप्टेंबर या दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. २७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जलसंधारण मंत्री संजय राठोड गुरुवारी नांदेड दौऱ्यावर…राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड गुरुवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची ते पाहणी करणार आहेत तसेच आढावा बैठकीत ते अधिक माहिती घेणार आहेत. जलसंधारण मंत्री राठोड हे गुरुवारी हदगाव, अर्धापूर, नांदेड, लोहा तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत तसेच दुपारी चार वाजता नांदेडमध्ये ते पूर परिस्थिती संदर्भाने आढावा बैठकही घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!