अपघात

नांदेडमध्ये बॅक वॉटरच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

दूल्हेशहा रहमान नगर येथील घटना, शहरातील अनेक भागात शिरले पुराचे पाणी, पंचवटी नगरातून अग्निशमन दलाने वृद्ध महिलेला पुराच्या पाण्यातून काढले 

नांदेड – विष्णूपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. या महापुरामुळे शहरातील अनेक भागात बॅक वॉटर शिरले असून अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचवेळी शहरातील दूल्हेशाह रहमान नगर येथे एका सोळा वर्षीय युवकाचा या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. स्थानिक नागरिकांनी या युवकाचा बाहेर काढला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे महापालिकेच्या अग्निशमन दलाने वसरणी भागातील पंचवटी नगरातील एका वृद्ध महिलेला पुराच्या पाण्यातून बाहेर काढले आहे.

विष्णूपुरी प्रकल्पातून सध्या अडीच हजार क्युसेस वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी गोदावरी नदी पात्राबाहेर आली असून शहरातील अनेक  सखल भागात पाणी शिरले आहे. वसरणी येथील पंचवटीनगर, जुन्या नांदेडातील काला पूल, गौतम नगर खडकपुरा, दूल्हेशहा रहमान नगर आदी भागात मोठ्या प्रमाणात बॅक वॉटर शिरले आहे. याच बॅकवॉटरमध्ये बुधवारी सकाळी शेख मिन्हाज शेख साजिद वय १६ वर्षे हा युवक पाण्यामध्ये बुडाला. तो बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शहरात महापालिकेकडून मंगळवारी सायंकाळपासून खबरदारीचा इशारा देण्यात आला होता. गोदावरी नदीचे पाणी शहरातील सखल भागात येणार आहे, नागरिकांनी खबरदारी घ्यावी याबाबत माहितीही देण्यात आली होती. मात्र बुधवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. महापालिकेचे हे पथक तेथे पोहोचलेही; मात्र त्याला स्थानिकांनी बाहेर काढून रुग्णालयात नेल्याची माहिती मिळाली होती, मात्र त्याचा मृत्यू झाला होता.

दुसरीकडे महापालिकेने वसरणी भागातील पंचवटी नगरात बॅकवॉटरमध्ये अडकलेल्या एका ७२ वर्षीय महिलेला सुखरूपपणे बाहेर काढले. महालाबाई विठ्ठलराव महात्मे असे या महिलेचे नाव आहे. महापालिकेचे अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे, उप अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, शिवाजी शिंदे, पेरेवार, कदम, ताटे यांनी परिश्रम घेतले.  या परिसरातील जवळपास शंभर कुटुंबीयांना मंगळवारी रात्रीच येथून हलविण्यात आले होते. या भागात पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!