Police

अहो आश्चर्यम्… नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या टीसीसाठी संस्थाचालक मागतात एअर कुलर..!

मुख्याध्यापकाच्या मध्यस्थीने झाली तीन हजार रुपयांत तडजोड

नांदेड – शैक्षणिक क्षेत्र हे सर्वात पवित्र क्षेत्र मानले जाते. मात्र या पवित्र क्षेत्रातही व्यावसायिकपणा सातत्याने वाढत आहे. ही बाब आता लपून राहिली नाही. याच व्यावसायिकतेचे उदाहरण नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील सोमठाणा येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पुढे आले आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थिनीची टीसी काढण्यासाठी संस्थाचालक मनोहर पवार याने त्या मुलीच्या पालकाकडे चक्क १२ हजार रुपये किंमतीचा सिम्फनी कंपनीचा कुलर मागितला. शेवटी मुख्याध्यापकाच्या माध्यमातून टीसी मागणाऱ्या पालकाशी तडजोड करत केवळ तीन हजार रुपये घेऊन टीसी देण्याचे मान्य केले. अखेर याप्रकरणी संस्थाचालक मनोहर पवार आणि मुख्याध्यापक बहिनाजी वरवंटे या दोघांविरुद्ध विरुद्ध लाच मागितल्या प्रकरणी कुंटूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची मुलगी ही नायगाव तालुक्यातील सोमठाणा येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाली आहे. तक्रारदाराने त्यांच्या मुलीची टीसी काढण्यासाठी शाळेत जाऊन संस्थाचालक मनोहर पवार याची भेट घेतली. त्यावेळी संस्थाचालकाने तक्रारदार यांना मुलीची टीसी देण्यासाठी १२ हजार रुपये किंमतीचे सिम्फनी कंपनीच्या कुलरची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने नाईलाजाने होकार दिला. ही वस्तूची मागणी लाच असल्याची तक्रारदाराला खात्री झाल्याने आणि लाच देण्याची इच्छा त्या तक्रारदाराला नव्हती. त्यामुळे त्यांनी नांदेड येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे २ जुलै रोजी याबाबत तक्रार दिली. या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणीची पडताळणी केली. त्यामध्ये मुख्याध्यापक तथा प्राचार्य बहिनाजी वरवंटे याने त्याच्या मोबाईलवरून संस्थाचालक मनोहर पवार याला संपर्क केला. त्याच मोबाईल फोनवरून तक्रारदार हेही संस्थाचालक मनोहर पवार याच्याशी त्यांच्या मुलीच्या टीसी संदर्भाने बोलले. त्यावेळी तडजोडीअंती ३ हजार रुपये मोबाईलद्वारे लाच मागितली. लाचेची ही रक्कम कॉलेजचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य वरवंटे याच्याकडे देण्यास संस्थाचालक मनोहर पवार यांनी सांगितले होते. ही बाब लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीतून स्पष्ट झाली आहे. त्यानंतर तक्रारदारांनी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य बहिनाजी वरवंटे यांच्याकडे मुलीच्या टीसी संबंधाने गेले. त्यावेळी वरवंटे याने संस्थाचालक मनोहर पवार याच्या मागणीप्रमाणे लाचेची रक्कम घेऊन या, असे म्हणून तीन हजार रुपये मागितले. हा सर्व प्रकार घडल्यानंतर तसेच पडताळणीनंतर संस्थाचालक मनोहर पवार आणि मुख्याध्यापक प्राचार्य बहिनाजी वरवंटे या दोघांवरुद्ध कुंटूर ठाण्यात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी उपाधीक्षक प्रशांत पवार यांनी ही कारवाई केली.

 दरम्यान, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन करताना कोणत्याही लोकसेवकाने शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास ०२४६२- २५३५१२ तसेच टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!