
नांदेड – घराजवळ दारू पिण्यास मज्जाव केल्याने तिघा जणांनी एका युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना जुन्या नांदेडातील देगलूर नाका भागात हिलालनगर येथे रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिलालनगर येथे १३ जुलैच्या सायंकाळी सय्यद अरबाज सय्यद युनूस यांच्या घराच्या पाठीमागे असलम ( जडो ) अक्रम आणि अमीर हे दारू पीत होते. त्यावेळी सय्यद सलमान याने त्यांना दारू पिण्यास मज्जाव केला. त्यामुळे अक्रम, आमिर आणि त्यांच्या भावामध्ये वाद झाला होता. त्यावेळी गल्लीतील लोकांनी त्यांचा हा वाद मध्यस्थी करून मिटवला होता.
मात्र पुन्हा १४ जुलैच्या पहाटे एकच्या सुमारास सलमान घरी असताना अक्रम, जडो व अमीर हे घरासमोर आले. त्यातील अक्रमने सलमानला हाक दिली. त्यामुळे सलमान हा घराबाहेर आला त्याच्यापाठोपाठ भाऊ सय्यद अरबाज हाही आला. अक्रम याने सलमानला खांद्यावर हात टाकून काही अंतर दूर घेऊन गेला. त्यावेळी भाऊ सय्यद अरबाज पाठीमागे जात असताना सलमानचा जोरात आवाज आला. त्यावेळी आवाजाच्या दिशेने सय्यद अरबाज हा धावला असता जडो आणि अमीर याने सलमानला पकडले होते. तर अक्रम याने त्याच्या हातातील खंजरने सलमानच्या मांडीत वार केला. त्याला खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत होते. त्यावेळी सलमानने पळत जाऊन ऑटोमध्ये लपण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी रईस व गल्लीतील इतर लोक जमा झाल्याने अक्रम, जडो आणि अमीर हे तेथून पळाले. त्यानंतर जखमी अवस्थेत सलमानला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरने तपासून तो मृत झाल्याचे सांगितले.
याप्रकरणी मयताचा भाऊ सय्यद अरबाज यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख अक्रम शेख मेहबूब रा. उमर कॉलनी, असलम उर्फ जडो सय्यद आलम रा. हिलाल मस्जिदसमोर आणि शेख आमिर शेख मोहम्मद रा. उमर कॉलनी या तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दोघांना केली अटक…या घटनेची माहिती मिळताच इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती घेतल्यानंतर या प्रकरणात दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीचाही पोलीस शोध घेत आहेत.