प्रशासकीय

नांदेड लोकसभा मतदारसंघात आज संध्याकाळी प्रचार थंडावणार

मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त

नांदेड :- नांदेड लोकसभाा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी आज २४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचार तोफा थंडावणार आहेत. मतदानाच्या आधी ४८ तासांसाठी सर्व राजकीय पक्षांना आपला प्रचार थांबावावा लागणार आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आला असून निर्भय वातावरणात मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सर्व यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विभाग प्रमुखांची व भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड, यांच्यासह हिंगोली मतदारसंघात येणाऱ्या किनवट व हदगाव येथील सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याशी तयारीबाबत चर्चा केली.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ प्रमाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या ४८ तासा अगोदरच्या कालावधीमध्ये १४४ कलम लागू होईल,  याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. या काळात सार्वजनिक सभा आयोजित करता येणार नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. बेकायदेशीरित्या जमा होता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमा होता येणार नाही किंवा एकत्रित फिरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

यासोबतच राजकीय पक्षांनी निवडणूक बूथ कुठे उभारावे, बुथवर कशी व्यवस्था असावी, त्या ठिकाणचे बॅनर बैठक व्यवस्था व गर्दीचे व्यवस्थापन या संदर्भातील निर्बंध जारी करण्यात आले आहे. मतदान केंद्राजवळ शस्त्र बाळगणे किंवा शस्त्र प्रदर्शन करणे प्रतिबंधित आहे. प्रचाराचा कालावधी संपल्यामुळे ४८ तासापूर्वी मतदारसंघाबाहेरील राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी मतदारसंघ सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रचार कालावधी संपल्यामुळे या जिल्ह्याचे, मतदार संघाचे मतदार नसलेले, राजकीय कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते, निवडणुकीतील कार्यकर्ते, मोहिमेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती प्रतिबंधित करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी बुधवारच्या सायंकाळी सहा वाजेपासून मतदान पूर्ण होईपर्यंत ४८ तास मद्य विक्री बंद करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात चोख बंदोबस्त करण्यात येत आहे. केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठिकठिकाणी पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत. निवडणूक केंद्रावरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मतदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आयोगाने ज्यांना अधिकार दिले आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्रात शेजारील परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, पोलिंग एजंट, मतदार तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी. कोणालाही मोबाईल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

२६ एप्रिल रोजी मतदान होत असून या दिवशी केवळ मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अत्यावश्यक व खाजगी आस्थापना दुकाने, रेस्टॉरंट या काळात सुरु असतील त्या ठिकाणाच्या सर्व व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना किमान दोन तासाची सुटी द्यावी, असे आदेश कामगार आयुक्त मार्फत जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार २६ एप्रिल  रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी आठवडी बाजार होते त्या ठिकाणीचे बाजार दुसरे दिवशी घेण्यात येणार आहेत.

४८ तासाच्या शांतता काळामध्ये आकाशवाणी व खाजगी चॅनलवरील निवडणूक विषयीच्या बाबीचे प्रसारण बंद करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मोबाईलवरील बल्क एसएमएस सेवाही या काळात बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

एकूण १८ लक्ष ५१ हजार मतदार…नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भोकर (२ लाख ९४ हजार ४०९), नांदेड उत्तर (३ लाख ४६ हजार ८८६), नांदेड दक्षिण (३ लाख ०८ हजार ७९०), नायगाव (३ लाख ०१ हजार २९९), देगलूर (३ लाख ०३ हजार ९४३), मुखेड (२ लाख ९६ हजार ५१६) असे एकूण १८ लक्ष ५१ हजार ८४३ मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये ९ लक्ष ५५ हजार ८४ पुरुष तर ८ लक्ष ९६ हजार ६१७ महिला तर १४२ तृतीय पंथीचा समावेश आहे. २ हजार ६२ केंद्रावर हे मतदान होणार आहे.

न होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!