
नांदेड :- नांदेड शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून पूरग्रस्तांच्या मदतीला मनपा प्रशासन धावून जात दोन दिवसापासुन मतदकार्य करीत आहे. याच पार्श्वभुमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी रविवारी शहरातील विविध पुरग्रस्त भागांना व शहरातील निवारा केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी आयुक्तांनी शहरातील नदीपात्रालगत व सखल भागात पाणी शिरल्याने महानगरपालिकेच्या वतीने पाण्याचा निचरा करण्याची प्रक्रिया व नागरिकांच्या स्थलांतरीत प्रक्रियेची पाहणी केली. याचबरोबर आयुक्तांनी तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली. दोन दिवसांत महापालिका प्रशासनामार्फत एकूण ९७० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
शोध व बचाव कार्यामध्ये महापालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी के.जी.दासरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष कार्य पार पाडले आहे. निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या नागरिकांना महापालिकेतर्फे जेवण, पिण्याचे पाणी इत्यादी जिवनावश्यक वस्तू पुरविण्यात येत आहेत. सदरील ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता, फवारणी, प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचाच आढावा आयुक्तांनी प्रत्यक्ष निवारा केंद्राच्या भेटीत घेतला आहे. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू, नितीन गाढवे, निलेश सुंकेवार, शहर अभियंता सुमंत पाटील, क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे उपस्थित होते.
या भेटीदरम्यान मनपा आयुक्त डॉ . डोईफोडे यांनी एनटीसी मिल एरिया, पाकीजा फंक्शन हॉल, लिबर्टी फंक्शन हॉल आणि नंदगिरी किल्ला या निवारा केंद्रांना भेट दिली. महापालिकेच्या निवारा केंद्रावर आश्रय घेतलेल्या आयुक्तांनी पुरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून महापालिका प्रशासन हवी ती मदत करण्यास तत्पर असल्याचे आश्वासन देऊन आयुक्तांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे पुराचे पाणी ओसरेपर्यंत निवारा केंद्र कोणत्याही परिस्थितीत न सोडण्याचे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले. निवारा केंद्र परिसरामध्ये प्रकाश व्यवस्था, साफ-सफाई, फवारणी आदी बाबींची चोख व्यवस्था ठेवून या सर्व बाबींचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल, याची दक्षता घेण्याबाबत सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आदेशित केले. यावेळी नागरिकांनी महापालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले आहे.
याप्रसंगी आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी गोदावरी नदीने ३५१ मीटरची इशारा पातळी ओलांडून ३५४.८९ मीटर ही धोक्याची पातळी सध्या गाठली आहे. पुढील २४ तास हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने नदी लगतच्या नागरिकांनी कुठलाही विलंब न करता तात्काळ जवळच्या निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी शहरात उदभवलेल्या पूर परिस्थितीत घाबरुन न जाता मदतीसाठी महानगरपालिकेच्या आपत्ती शाखेला किंवा जवळच्या क्षेत्रिय कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



