प्रशासकीय

नांदेडमध्ये पालकमंत्र्यांचे ‘वराती मागून घोडे’..!

कायदा व सुव्यवस्थेचा १२ दिवसानंतर घेणार आढावा, पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडला १४ एप्रिलचा बंदोबस्त

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे शनिवारी विशेष बैठक घेणार आहेत. नांदेड शहरामध्ये गुन्हेगारी टोळी युद्धातून तीन दिवसात पाच खून झाले होते त्यानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे आला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी तातडीने नांदेडला भेट देणे आवश्यक होते. छत्रपती संभाजीनगर ते नांदेड हे अंतर केवळ सहा तासांचे असताना पालकमंत्र्यांना तब्बल बारा दिवसानंतर आता नांदेडच्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे एकूणच पालकमंत्र्यांची शनिवारी होणारी ही आढावा बैठक ‘वराती मागून घोडे’ याचाच प्रत्यय देणारी ठरणार आहे. त्याचवेळी नांदेड जिल्ह्याचा २३ कोटी रुपये निधी अखर्चित राहिल्याने परत गेला आहे. त्याची जबाबदारी कोणावर निश्चित करणार याकडे लक्ष लागले आहे.

नांदेडमध्ये ४ एप्रिल ते ६ एप्रिलदरम्यान गुन्हेगारी टोळ्यांच्या अंतर्गत वादातून तब्बल पाच खुनाच्या घटना घडल्या. या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यातही विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात पोलिसांसमोर झालेल्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्याचवेळी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कॉम्बिंग ऑपरेशन पार पाडले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, जिल्ह्यातील इतर वरिष्ठ अधिकारी त्यासह शहरातील ठाणे प्रमुखांनीही आपापल्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जेरबंद करीत पुन्हा एकदा नांदेड शहर, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणली. त्याचवेळी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा यशस्वी बंदोबस्त पार पाडला. त्यानंतर आता आपल्या सुनियोजनानुसार पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेड जिल्हा दौरा निश्चित केला आहे.

त्यातही प्रामुख्याने शुक्रवारी माहूरगड येथील दत्त शिखर संस्थानचे महंत यांचे दर्शन हा प्रमुख कार्यक्रम या दौऱ्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. दर्शनानंतर रेणुका माता दर्शन तसेच परिसरातील विकास कामांची पाहणीही पालकमंत्री करणार आहेत. माहूर विकास आराखडा सादरीकरण आणि जिल्हाधिकारी तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ते माहूर तहसील कार्यालयात बैठकही घेणार आहेत. आदिवासी उपयोजना आणि इतर विषयावरही ते माहुर येथेच बैठक घेतील. त्यानंतर ते आज शुक्रवारी नांदेडमध्ये मुक्कामी आहेत. शनिवारी सकाळी नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात नियोजित ओबीसी स्वयंरोजगार मेळाव्याच्या तयारीची ते पाहणी करणार आहेत. सकाळी दहा वाजेपासून नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भाने प्रशासकीय अधिकाऱ्यांची ते आढावा बैठक घेणार आहेत तसेच बळीराजा शेती पाणंद रस्ते योजना, जिल्हा परिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग आदी विभागांचाही ते आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील.

नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे त्यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांनी चिंता व्यक्त केली होती. या सर्व घटनांची जबाबदारी निश्चित केली जाईल असे खुद्द माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. त्या संदर्भात पुढे काय झाले हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. आता काही दिवसातच पोलिसांच्या कठोर नियोजनामुळे नांदेडची परिस्थिती पूर्वपदावर आली. या पार्श्वभूमीवर पुन्हा आता पालकमंत्री नेमका काय आढावा घेतील, याकडेही लक्ष लागले आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वीज वितरण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा प्रमुख प्रश्न सोडविण्याची गरज आहे. नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी गुरुवारी वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात किती समाधानकारक उत्तरे मिळाली की निव्वळ बैठकीचा फार्स होता हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे. गेल्या पंधरा दिवसाची परिस्थिती पाहता शहरातील विविध भागातील डीपी पेटण्याचे प्रमाण वाढले आहे. थोडासाही वारा, पाऊस येताच वीजपुरवठा खंडित होत आहे. या विजेच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी करणे अतिशय गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!