क्राईम

नांदेडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांची घातक शस्त्र विरोधी मोहीम..!

११ गुन्हे दाखल, १२ आरोपींना अटक, २५ एप्रिलपर्यंत विशेष मोहीम 

नांदेड – नांदेडमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खुद्द जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना चक्क दुचाकीवर पेट्रोलिंग करावी लागलेली असताना आता नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनीही नांदेड शहर व जिल्ह्यासह संपूर्ण परिक्षेत्रात अवैध शस्त्रसाठा शोधण्यासाठी २५ एप्रिलपर्यंत विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात ४ एप्रिलपासून निर्माण झालेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता या मोहिमेचा किती प्रभाव नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यावर होईल याकडे लक्ष लागले आहे.

नांदेडच्या अंतर्गत रस्त्यावर नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार दोन दिवसापूर्वी दुचाकीवर पेट्रोलिंग करत असताना दिसले. नांदेड जिल्ह्यात स्थानिक गुन्हा शाखा, अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड शहर व इतवारा उपअधीक्षक त्याचवेळी नांदेड शहरातील सहा ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच इतर फौजफाटा असतानाही खुद्द पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना पेट्रोलिंगसाठी दुचाकीवर फिरण्याची वेळ का आली? हा प्रश्न आता शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस ठाणे अधिकाऱ्यांना सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. तीन दिवसात पाच खुनाच्या घटना घडल्यानंतर संपूर्ण नांदेड हादरले होते. नांदेडची ही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती संपूर्ण राज्यात उघड झाली होती. गुन्हेगारी टोळ्यांनी एकमेकांना संपवण्यासाठी थेट रस्त्यावर तलवार, खंजीरने हल्ले केले होते. एका व्यक्तीचा मृत्यू तर शासकीय रुग्णालयात पोलीस कर्मचारी आणि शासकीय रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांसमोर करण्यात आला होता. या घटनेने तर आणखीनच संताप व्यक्त झाला होता. त्या घटनेप्रकरणी दोन पोलीस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात आगामी सण, उत्सव आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर २५ एप्रिलपर्यंत गुटखा, अंमली पदार्थ आणि घातक शस्त्रविरोधी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतच्या सविस्तर सूचना त्यांनी १० एप्रिल रोजी परिक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांना निर्गमित केल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत राबविण्यात आलेल्या कारवाईत शस्त्र अधिनियमांतर्गत एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांच्याकडून ५७ हजार ८५२ रुपये किमतीच्या तलवार, खंजीर जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी १२ आरोपींना अटकही केली आहे. परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

नांदेडमध्ये गुन्हेगारी टोळ्यांनी थैमान घातले असताना ६ एप्रिल रोजी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड शहरातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी नांदेड पोलिसांना शहरातील रेकॉर्डवरील आणि संशयित गुन्हेगारांजवळील अवैध शस्त्र जप्त करण्याचे आदेश दिले. पिस्टल, तलवारी, खंजीर असे शस्त्र शहरातील शांतता आणि सुव्यवस्थेसाठी घातक असल्याचेही उमाप यांनी स्पष्ट केले होते. त्याचवेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानंतर नांदेडमध्ये सर्वच पोलीस ठाणे अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. त्याचवेळी त्यांची धिंडही काढली. त्यानंतर काही अंशी का होईना परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!