
नांदेड – राज्य शासनाने दोन महिन्यापूर्वीच गरीब, झोपडपट्टीधारक, अतिक्रमण धारकांना त्याच ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय तसेच पक्के घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने नांदेडमध्येही अतिक्रमणे नियमित करून घेऊन जेवढे लागतील तेवढे घरे पंतप्रधान आवास योजनेतून देण्यात येतील, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. समृद्धी महामार्ग नांदेडपर्यंत जोडण्यात येत असल्याने मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालनानंतर आता तिसरे औद्योगिक केंद्र नांदेड होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ५ जानेवारी रोजी नांदेडमध्ये इंदिरा गांधी मैदानावर जाहीर सभा झाली. यावेळी राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माजी मुख्यमंत्री,खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, माजी मंत्री डी. पी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या ७० वर्षात देशातील राज्यकर्त्यांनी शहरासाठी विकासाच्या योजना तयार केल्यास नाहीत. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांचा विकास केला. शहर विकासासाठी हजारो कोटी रुपये उपलब्ध करून दिले. वाढत्या शहरीकरणामुळे गावाकडील लोक शहरांमध्ये आले; मात्र जागेअभावी मिळेल तिथे ते राहू लागले. त्यातून झोपडपट्टी, अतिक्रमणाचा प्रश्न उद्भवला. या प्रश्नाचे गांभीर्य पाहता राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वीच गरिबांचे घरे, झोपडपट्टी, अतिक्रमण आहेत त्याच ठिकाणी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना मालकी पट्टेही दिले जाणार आहेत. शासनाकडून त्यांना विविध योजनेतून पक्क घरही बांधून दिले जाणार आहे. नांदेडमध्येही एकही गरीब बेघर राहू नये, याची काळजी भाजपाकडून घेतली जाईल. नांदेडमध्ये पहिल्या टप्प्यातच अतिक्रमणे नियमित केले जातील तसेच गरिबांना घरे उपलब्ध व्हावीत यासाठी पाहिजे तेवढी घरे पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून दिले जातील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी नांदेडसह मराठवाड्यातील इनामी जमिनी, खिदमत मास, मदतमास अशा विविध प्रकारच्या जमिनीवर अनेकांची घरे आहेत, त्यांनाही मालकी हक्क देण्याचा कायदा करण्यात आला आहे. या मालमत्ता धारकांनाही आता जमिनीचे पीआर कार्ड उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले. नांदेडमध्ये आजघडीला ३५१ कोटी रुपये खर्चून भूमिगत गटार योजना सुरू आहे. १६८ कोटींची पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. गोदावरी शुद्धीकरण, घनकचरा प्रकल्प, रस्ते ही कामेही सुरू आहेत.
दुसरीकडे नांदेड – जालना या समृद्धी महामार्गाचे कामही प्रगतीपथावर आहे. आठ तासात नांदेडहून मुंबईला जाता येईल, अशी सोय केली जात आहे. समृद्धी महामार्गाला नांदेड जोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना या मराठवाड्यातील दोन औद्योगिक जिल्ह्यानंतर तिसरे केंद्र म्हणून नांदेड उद्यास येणार आहे. त्यामुळे नांदेडच्या विकासाचा वेग निश्चितच वाढताच राहील. नांदेड – बिदर नांदेड – लातूर या रेल्वे मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गोदावरी स्वच्छ करण्याचे मिशन हाती घेतले आहे. नांदेडची स्मार्ट आणि सेफ सिटी याकडे वाटचाल सुरू असल्याचेही फडणवीस म्हणाले.
विरोधकांनी विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी टीका केली होती; मात्र ही योजना अद्यापही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आता लाडक्या बहिणींना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आतापर्यंत ५० लाख महिला लखपती दीदी झाल्या आहेत. हा आकडा एक कोटीपर्यंत नेण्यात येणार आहे. यामध्ये नांदेडचा पहिला क्रमांक राहील याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. भाजपाने दिलेला संकल्पनामा पूर्ण करण्याची जबाबदारी देवाभाऊकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. १५ जानेवारीला तुम्ही कमळाची काळजी घ्या, पुढचे पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ या शब्दात त्यांनी आपले भाषण समाप्त केले.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही नांदेड महापालिका निवडणुकांची जबाबदारी मिळणे, ही मोठी बाब असल्याचे सांगितले. निवडणुका संपताच आपण नांदेडला विसरू,. असे होणार नाही. नांदेडच्या संकल्पनाम्यात ज्या बाबी आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपण पुढील काळात प्रयत्नशील राहू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आ. श्रीजया चव्हाण, आ. डॉ. तुषार राठोड, आ. भीमराव केराम, आ. जितेश अंतापुरकर, माजी आमदार अमरनाथ राजुरकर, संजय कौडगे, प्रवीण साले, चैतन्य बापू देशमुख, देविदास राठोड यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची, उमेदवारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन भाजपा प्रवक्ते संतोष पांडागळे, शीतल खांडील यांनी केले.
आम्ही नांदेडचा विचार कधीच सोडला नाही..! काळ कोणताही असो आम्ही मात्र नांदेडचा विचार कधीही सोडला नाही. नांदेडकर आणि आपले नाते हे फेविकॉलचा जोड असल्याचे यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले. वेगवेगळ्या निवडणुकात विरोधक आश्वासने देतात मात्र त्याची पूर्तता होत नाही. आम्ही मात्र जे बोलतो ते करून दाखवतो एकदा आश्वासन दिल्यानंतर ते पूर्ण करतोच असे सांगताना ‘मै जो बोलता हू वो करता हुं खुद की भी नही सुनता हा हिंदी डायलॉगही चव्हाण यांनी मारला. विरोधकांना आज नांदेडमध्ये उमेदवार मिळाले नाहीत. उत्तर नांदेडमध्ये शिवसेना स्वतंत्र लढत आहे तर दुसरीकडे दक्षिण नांदेडमध्ये मात्र शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. पक्षाचेच असे दोन तुकडे झाल्याचे आपण पाहत आहोत. त्यामुळे आगामी काळात काय चित्र राहील, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला.



