प्रशासकीय

माळेगावातील शासकीय कार्यक्रम राष्ट्रीय दुखवट्यामुळे २ जानेवारीनंतर होणार

जिल्ह्यात १ जानेवारीपर्यंत कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आदेश

नांदेड  : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात २६ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे २९ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रम २ जानेवारीनंतर घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. एक जानेवारीपर्यंत जिल्ह्यात कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करू नयेत असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी माळेगाव यात्रेसंदर्भात शुक्रवारी जारी केलेल्या पत्रकामध्ये यात्रेतील आयोजित कार्यक्रमांमध्ये झालेला बदल जाहीर केला आहे. दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रमांचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत मार्फत केले जाते.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. दिवंगत माजी पंतप्रधानांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात २६ डिसेंबर ते १ जानेवारी असा एकूण सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दुखवट्याच्या कालावधीत संपूर्ण भारतात सदर दिवशी कोणत्याही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे आदेश शासनाने दिले आहेत. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनीही या संदर्भात आदेश निर्गमित केले आहेत.

पारंपारिक पद्धतीने स्थानिक देवस्थान संस्थानमार्फत तिथीनुसार निघणारी २९ डिसेंबरची देव स्वारी व पालखीचे पूजन नियोजित वेळी म्हणजे २९ डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मात्र २९ तारखेनंतरच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला आहे.  आता सर्व कार्यक्रम २ जानेवारीनंतर होणार आहेत. २९ तारखेपासून यात्रा नियमित सुरू असेल. मात्र जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित काही कार्यक्रमांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने नव्याने जाहीर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार २ जानेवारीनंतरचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.२ जानेवारीला सकाळी दहा वाजता अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचे उद्घाटन होईल.महिला व बालकांसाठी विविध स्पर्धा सकाळी ११ वाजता दुपारी दोन वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे.तर दुपारी ३ वाजताच लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. हे सर्व कार्यक्रम २ जानेवारी रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळी घेण्यात येणार आहे.

३ जानेवारीला सकाळी ११ वाजता आरोग्य शिबिर होणार आहे. तर याच दिवशी जिल्हा परिषदेमार्फत पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होईल. ४ जानेवारी रोजी सकाळी दुपारी १२वाजता शंकर पटाचे ( बैल जोडी, बैलगाडा शर्यत ) आयोजित करण्यात आली आहे.५ जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता पशुप्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण समारोह होणार आहे. तर ५ जानेवारीला दुपारी बारा वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे.

 जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील कार्यक्रमाचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांच्या बदललेल्या तारखांना नागरिकांनी, भाविकांनी व श्रद्धाळूंनी लक्षात घ्यावे. राष्ट्रीय दुखवट्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, सहभागीत्व ठेवावे, असे आवाहन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!