
नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका येथे २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीच्या अनुषंगाने फक्त एका दिवसासाठी नांदेड शहरातील मालमत्ता धारकांना थकबाकीसह सन २०२४-२५ चा पूर्ण कराचा भरणा केल्यास मालमत्ता करात थकबाकीवरील शास्तीत ८० टक्के सूट मिळणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
नांदेड शहरात १ लाख १६ हजाराहून अधिक एकूण मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडे असलेल्या थकीत कर वसुलीसाठी महापालिकेने आता वेगवेगळ्या मोहीम हाती घेतल्या आहेत. चालू वर्षासह एकूण मालमत्ता कराच्या थकबाकीचा आकडा हा २०० कोटीहून अधिक आहे. महापालिकेने २०२४-२५ मध्ये १०० टक्के मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने कर वसुलीस सुरुवातही करण्यात आली आहे.२८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजनही करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय लोक अदालत नांदेड महापालिका येथे होणार आहे. महापालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना लाभ मिळण्यासाठी आणि महापालिकेच्या कर वसुली चालना देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण आठ नियम ४१ व ५१ मधील तरतुदीनुसार आयुक्तांना प्राप्त अधिकारानुसार होत असलेल्या या लोक अदालातीमध्ये जे मालमत्ताधारक आपल्या कराचा थकबाकीसह सन २०२४-२५ चा पूर्ण कराचा भरणा करतील त्यांना मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीमध्ये लोक अदालतीच्या एका दिवसासाठी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी ८० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही त्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीत वसुली लिपिक अथवा ऑनलाईन पद्धतीने महापालिका मालमत्ता कराचा भरणा करून या ८० टक्के सूट योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख प्रयत्नशील आहेत. नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयापर्यंत योजनेची माहिती पोहोचविण्यात आल्याचे उपायुक्त संधू यांनी सांगितले. नागरिकांनी सदर शास्ती माफी योजनेत ८० टक्के सूट योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.