Police

नांदेडमध्ये वाळूमाफियांकडून १ लाख ३ हजार रुपयांची वसुली करणारे पाच पोलीस निलंबित 

ऑपरेशन फ्लश आऊट संशयाच्या भोवऱ्यात..!अवैध धंदे रोखण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाकडूनच सुरू होती थेट वसुली, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उगारला कारवाईचा बडगा

नांदेड : अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी नेमलेल्या विशेष पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडूनच  वाळूमाफियाकडून वसुली सुरू असल्याची माहिती नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्राप्त झाली. यानंतर या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना नांदेडमध्ये तिरंगा चौकात पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख १ लाख ३ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हालसे, पोलीस हवालदार ब्रह्मानंद लामतुरे याच्यासह पोकॉ. राम मुळे, महेश कावळे, तुकाराम जुन्ने या पाच जणांना निलंबित करण्याचे आदेश शहाजी उमाप यांनी दिले आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलातील विशेष पथकाच्या या कामगिरीनंतर आता ऑपरेशन फ्लश आऊट संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

लोहा येथील बायपास रस्त्यावर ११ ऑक्टोबर रोजी काही पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे वाळू वाहतूक करणारी वाहने आढळून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पैसे स्वीकारत असल्याची माहिती नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्राप्त झाली. या माहितीनंतर पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांनी माहिती घेतली असता सदर ठिकाणी थांबलेले पोलीस हे नांदेड जिल्हा पोलीस दलातील विशेष पथकात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हालसे व इतर चार अंमलदार होते. हे सर्वजण पहाटेच्या वेळी वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी एका खाजगी वाहनातून लोहा येथे गेले होते. मात्र कारवाई न करता ते थेट वाळूमाफियाकडून वसुलीच करीत होते.
याबाबत कंधारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप यांना कळविण्यात आले.  त्यांना लोहा येथे रवाना होण्याचे आदेश देण्यात आले. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती जगताप या लोहा येथे पोहोचण्यापूर्वीच पोलिस उपनिरीक्षक हालसे आणि इतर अंमलदार हे त्यांच्या जवळील खाजगी वाहनातून लोहा येथून नांदेडकडे निघाल्याची माहिती मिळाली.  सदर वाहनास रोखण्याबाबत उपविभागीय अधिकारी जगताप यांना कळवण्यात आले होते. नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील  तिरंगा चौकात सकाळी ८ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास जगताप यांनी सदरचे वाहन अडवले त्यात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हालसे पोलीस हवालदार ब्रह्मानंद लामतुरे हे दोघे आढळून आले. वाहनामधील पोलीस अधिकारी व अंमलदारांची झडती घेतली असता दोघांच्या झडतीत रोख १ लाख ३ हजार रुपये आढळून आले. यातील तीन पोलीस अंमलदार त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल राम मुळे, महेश कावळे व पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम जुन्ने हे परतीच्या प्रवासात लोहा येथेच थांबल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी या पाचही जणांना निलंबित केले आहे. त्यांची प्राथमिक चौकशी देगलूरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिक माहिती घेतली असता नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भनगी येथून सदरची वाळू वाहतूक होत असल्याची बाब  पुढे आली आहे. त्यांनी सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांना याबाबतची खातरजमा करण्यासाठी वाहेगाव, भानगी येथे पाठवले. त्या ठिकाणी गोदावरी नदीपात्रातून ५० तराफ्यांच्या सहाय्याने शंभरहून अधिक मजूर वाळू उपसा करत असल्याचे आढळून आले. गोदावरी नदीकाठी अशा प्रकारे एकूण सहा ठिकाणी ३०० ब्रास वाळू नदीपात्रातून बाहेर काढून साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. या माहितीवरून पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून महसूल विभागास पाचारण केले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी वाहेगाव, भनगी येथे बंदोबस्त ठेवला असून शनिवार पुन्हा सकाळी कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.

एकूणच या प्रकरणात ज्यांना अवैध धंद्याविरुद्ध  कारवाईचे अधिकार दिले होते त्यांच्याकडूनच वाळूमाफीयांकडून थेट वसुली सुरू असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. आणखी कोणकोणत्या अवैध धंदेवाल्याकडून पोलिसांकडून अशी वसुली सुरू आहे ही बाबही आता संशोधनाची आहे. वाळूमाफीया आणि पोलिसांची ही साखळी वर्षानुवर्ष सुरू होती. अखेर या साखळीला पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आता लगाम घातल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी काळात ही कारवाई आणखी जोमाने होईल हे निश्चित. मात्र आता विशेष पथकेही वसुलीच्या कामाला लागल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस विभागाची चिंता आणखीच वाढली आहे. नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार याप्रकरणी आता नेमकी काय भूमिका घेतील याकडेही लक्ष लागले आहे. त्याचवेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट मोहिमेबाबतही आता शंका निर्माण होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!