राजकीय

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिले इंटेलेक्चुअल उमेदवार 

प्रा.गौतम दुथडे यांना नांदेड उत्तरची उमेदवारी, दलित सेनेची राजकीय पार्श्वभूमी, रामविलास पासवान यांनाही केले होते प्रभावित

नांदेड – वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ३० उमेदवार जाहीर केले आहेत. बुधवारी जाहीर केलेल्या या यादीमध्ये नांदेड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा ही समावेश आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियावर आम्ही किती काम करत आहोत असे दर्शवणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांना माघारी पाठवत नांदेड उत्तरमधून प्रा. गौतम दुथडे, किनवटमध्ये प्रा. विजय खुपसे या इंटेलेक्चुअल उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे या लढती आता एका वेगळ्या दिशेने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यातील ३० विधानसभा मतदारसंघात उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघातून प्रा. विजय खुपसे, नांदेड उत्तरमधून प्रा. डॉ. गौतम दुथडे आणि देगलूर विधानसभा मतदारसंघातून सुशीलकमार देगलूरकर यांना उमेदवारी घोषित केली आहे. यापूर्वीच्या यादीत नांदेड जिल्ह्यातील लोहा -कंधार आणि नांदेड दक्षिण या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार वंचित बहुजन आघाडीने घोषित केले आहेत. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघापैकी पाच मतदारसंघात वंचितचे उमेदवार आता निश्चित झाले आहेत. जिल्ह्यात उमेदवारांची घोषणा करण्यात वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे.  इतर कोणत्याही पक्षाने उमेदवार घोषित केले नाहीत. वंचित बहुजन आघाडीने मात्र नऊ पैकी पाच उमेदवार रिंगणात उतरविले.
प्रा. गौतम दुधडे हे दलित सेनेच्या माध्यमातून राज्यस्तरावर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कार्यशैलीतून दिवंगत नेते रामविलास पासवान यांनाही प्रभावित केले होते. ते नांदेडमधील यशवंत महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ही संस्था माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची असल्यामुळे सोशल मीडियावर प्रा. दुथडे यांच्या उमेदवारीबाबतही वेगवेगळ्या टीका टिप्पणी केल्या जात आहेत.
नांदेड दक्षिणमध्ये वंचित बहुजन आघाडीने फारूख अहमद यांना यापूर्वीच रिंगणात उतरविले आहे. त्यांची उमेदवारी निश्चित मानली होती. त्याप्रमाणे पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. नांदेड उत्तरमधून मात्र वंचित बहुजन आघाडीकडून अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक होते. यामध्ये अनेकांनी आपण बाळासाहेबांच्या किती जवळ आहोत हे दर्शवण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. मात्र तो आता फोल ठरला आहे. कारण आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भाने नांदेडमध्ये ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच एक बैठक घेतली होती. यामध्ये जिल्ह्यातील सर्व प्राध्यापक, विचारवंत, बुद्धीवादी यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीत झालेल्या चर्चेतून नांदेडमधील उमेदवाराची व्यूहरचना झाल्याचे स्पष्ट होत आहे.
देगलूरमध्येही माजी नगरसेवक सुशीलकुमार देगलूरकर यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीत देगलूरकर हे नगर काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून कार्यरत होते. नंतरच्या कालावधीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यांना थेट विधानसभा लढविण्याची संधी देण्यात आली आहे.
किनवटमध्ये उमेदवारी घोषित केलेले प्रा. विजय खुपसे हे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील किनवट पंचायत समितीचे सभापती म्हणून कार्यरत होते. तर खूपसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर त्यांना किनवटमध्ये वंचितने संधी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने दुसऱ्या टप्प्यात घोषित केलेले तीनही उमेदवार हे नवखे आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात किती लढत देऊ शकतील याकडेही आता लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!