नांदेड जिल्हा

नांदेड जिल्ह्यात पुराचे आणखी तीन बळी, हसनाळ येथील तीन महिलांचे मृतदेह सापडले 

दोघांचा शोध सुरू, बचाव कार्यासाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी देगलूरमध्ये दाखल..!

नांदेड – नांदेड जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीत सोमवारी आणखी तीन बळी गेले आहेत. दोघांचा शोध सुरू आहे. मुखेड तालुक्यातील हसनाळ येथील ललिताबाई भोसले वय ६०, भिमाबाई हिरामण मादळे वय ६५ आणि गंगाबाई गंगाराम मादळे वय ६५ या तीन महिलांचा मृतदेह सापडला आहे.  हसनाळ येथीलच पिराजी थोटवे आणि चंद्रकला विठ्ठल शिंदे या दोघांचा शोध घेतला जात आहे. जिल्ह्यात यापूर्वी पावसाने तीन बळी गेले आहेत. जिल्ह्यात पूर परिस्थितीत बचाव कार्याला वेग यावा यासाठी भारतीय सैन्य दलास पाचारण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्य दलाची एक तुकडी देगलूरमध्ये सायंकाळी दाखल झाली आहे. सैन्य दलाच्या तुकडीमुळे जिल्ह्यात पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या कार्याला गती मिळणार आहे.

सोमवारची पहाट मुखेड तालुक्यासाठी काळ बनूनच आली होती. सोमवारी पहाटेच मुखेड तालुक्यात लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात एकच हाहा:कार उडाला. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले. हे पाणी घराच्या पत्रापर्यंत आले. त्यामुळे संपूर्ण गावच पाण्याखाली गेले होते. या आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. एसडीआरएफच्या पथकाने सकाळीच बचाव कार्याला प्रारंभ केला. मात्र एकूणच गंभीर परिस्थिती पाहता हसनाळ येथे पुराने तीन बळी घेतले आहेत. हसनाळ येथील ललिताबाई भोसले वय वर्ष ६०, भिमाबाई हिरामण मादळे आणि गंगाबाई गंगाराम मादळे वय ६५ या तिघींचा मृतदेह पुरात बुडालेल्या घरातून बाहेर काढण्यात आला आहे. हसनाळ येथील पिराजी म्हैसाजी थोरवे आणि चंद्रकला विठ्ठल शिंदे हे अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. पावसाने जिल्ह्यात यापूर्वी कंधार तालुक्यातील कोट बाजार येथील शेख नासेर शेख अमिन आणि त्यांची पत्नी शेख हसीना शेख नासिर या दोघांचा घरात झोपलेले असताना भिंत पडून मृत्यू झाला तर किनवट तालुक्यातील बोधडी येथे स्कूल बसचालक प्रेमसिंग मोहन पवार वय ४० वर्ष हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्युमुखी पडले होते. जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात पुराचे पाच बळी गेले आहेत. पशुधनाच्या हानीचा आकडा तर अगणितच आहे.

मुखेड तालुक्यात पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचा आकडा हा जवळपास ३०० पर्यंत होता. त्यात एकट्या रावणगाव येथे जवळपास अडीचशे नागरिक या पुराच्या पाण्यात अडकले होते. बचाव कार्यासाठी दाखल झालेल्या आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचा बचाव करण्यात आला. हसनाळ येथील तीन महिलांना मात्र वाचवण्यात अपयश आले. जिल्ह्यात तीन दिवसांपासून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. किनवट, हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, नांदेड, कंधार या तालुक्यात नद्यांना मोठा पूर आला आहे.

जिल्ह्यात निर्माण झालेल्या या पूर परिस्थितीत बचाव कार्यासाठी एसडीआरएफसह आता सैन्य दलालाही पाचारण करण्यात आले आहे. सैन्य दलाची एक तुकडी छत्रपती संभाजीनगर येथून देगलूर येथे पोहोचली आहे. नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली त्याचवेळी आवश्यक त्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.

  • मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी महसूल मंडळात एकाच दिवशी तब्बल ३५४.७६ मिलिमीटर आणि मुक्रमाबाद महसूल मंडळात २०६.७५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. देगलूर तालुक्यातील मरखेल महसूल मंडळात १५८, माळेगाव महसूल मंडळात १२७ हनेगाव महसूल मंडळात १५८, किनवट तालुक्यातील इस्लापूर महसूल मंडळात १२५.२५, जलधारा मंडळात ९०.७५, शिवनी मंडळात ८९ मिलिमीटर आणि नायगाव तालुक्यातील कुंटूर महसूल मंडळात ७१.२५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!