
नांदेड – नांदेड शहरातील देगलूर नाका भागात गुरुवारी दुपारी इस्लामपुरा येथे नाल्याच्या पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत. या द्विसदस्यीय समितीला २४ तासात अहवाल देण्याच्याही सूचना आयुक्तांनी दिल्या.
देगलूर नाका भागातील इस्लामपुरा भागातील मोहंमद अली वय १३ वर्ष, मोहंमद फुरखान वय १८ वर्ष, मोहंमद अदनान वय ८ वर्ष आणि मोहंमद रेहान वय ११ वर्ष हे चौघेजण शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. वाटेत हारूनबाग भागात एका मोठ्या खड्ड्यात पाणी साचलेले होते. त्या पाण्यात पोहण्यासाठी ही मुले उतरली. मात्र पाणी खोल होते. मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. यात चारही मुले बुडाली. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या चार मुलांचा मृत्यू झाला त्याठिकाणी महापालिकेकडून खाजगी कंत्राटदारामार्फत नाल्याचे आणि ड्रेनेज लाईनचे काम सुरू होते. त्याचवेळी बाजूला खाजगी प्लॉटिंग धारकांनी प्लॉटिंग टाकून बांधकाम सुरू केले होते. याच ठिकाणी महापालिकेच्या कंत्राटदाराकडून खोदकाम करण्यात आले; मात्र त्या खड्ड्यात पाणी कसे साचले, त्या ठिकाणी सुरक्षेच्या उपायोजना का केल्या गेल्या नाहीत? याची चौकशी महापालिकेकडून सुरू करण्यात आली. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फरहत उल्ला बेग यांची द्विसदस्यी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला चौकशी करून २४ तासात अहवाल देण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत.
इस्लामपुरा घटनेत पालिकेचा कंत्राटदार, कर्मचारी किंवा अधिकारी किंवा खाजगी प्लॉटिंगधारक जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर २४ तासात कारवाई केली जाईल असे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले. हा दुर्दैवी अपघात आहे. या प्रकरणात संवेदनशील भावनेने महापालिका आपले कर्तव्य पार पाडणार आहे. त्याचवेळी संबंधितावर निश्चितपणे कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.



