नांदेड – विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या भाजपाच्या दिलीप कंदकुर्ते, मिलिंद देशमुख, संजय घोगरे यांच्यासह वैशाली देशमुख यांची भाजपाने हकालपट्टी केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढत आहे. महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध या तिघांनी बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकल्याचे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले आहे. महाराष्ट्रात अशा ४० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपाने ज्यांना विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्त केले होते त्या मिलिंद देशमुख यांनी बंडखोरी केली. या मतदार संघात महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर हे रिंगणात उतरले आहेत. २०१४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवलेल्या मिलिंद देशमुख यांना चौथ्या स्थानावर रहावे लागले होते. त्यांना २३ हजार १०३ मते मिळाली होती. २०२४ मध्ये ते पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहेत. त्यांनी महायुतीचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्याविरुद्ध आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांच्यावर कारवाई करताना पक्षाने त्यांच्या सौभाग्यवती वैशाली देशमुख यांनाही पक्षातून निष्कासित केले आहे. त्यांच्याकडे भाजपा महिला मोर्चाची जबाबदारी होती.
दुसरीकडे नांदेड दक्षिण मतदारसंघात २०१९ आणि आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही बंडखोरी करणाऱ्या भाजपाचे नांदेड महानगराध्यक्ष असलेल्या दिलीप कंदकुर्ते यांनाही पक्षातून हाकलले आहे. विशेष म्हणजे भाजपाने कंदकुर्ते यांना २०१९ मध्येही पक्षातून हाकलले होते. मात्र कंदकुर्ते यांनी पक्षातील आपल्या गॉडफादर मार्फत पुन्हा पक्ष प्रवेश करीत नांदेड महानगराध्यक्ष तसेच विधानसभा प्रमुख पदही मिळवली होती. त्यांनी यावेळी शिवसेनेचे आनंद बोंढारकर या महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. २०१९ मध्येही युतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. मात्र २०१९ मध्ये त्यांच्या उमेदवारीला भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबाच असल्याचे प्रचारातील काही भाजपा नेत्यांच्या सहभागातून स्पष्ट झाले होते. २०२४ मध्येही भाजपाचा अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांना असाच पाठिंबा आहे काय..? याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
नांदेड दक्षिण मतदार संघातच भाजपा युवा मोर्चाची जबाबदारी सांभाळलेले संजय घोगरे यांनीही बंडाचे निशाण उभारले आहे. घोगरे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत महायुतीच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांनाही पक्षातून हाकलले आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या ७ नोव्हेंबर रोजी नांदेड दौरा आहे. या नांदेड दौऱ्यापूर्वीच त्यांनी बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. बंडखोरांना पक्षात कोणतेही स्थान नसल्याचा संदेश या हकालपट्टीतून देण्यात आला आहे.