राजकीय

अन् राहूल गांधी पोहोचले नांदेड मध्यवर्ती बसस्थानकात..!

काँग्रेस नेते राहुल गांधींशी हस्तांदोलन आणि सेल्फी काढण्यासाठी प्रवाशांची एकच गर्दी... रसवंती गृहात घेतला उसाच्या रसाचा आस्वाद

नांदेड – संध्याकाळची वेळ…  दिवाळी संपल्यानंतर प्रवासी आपापल्या गावी तसेच कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी नांदेड मध्यवर्ती बसस्थानकात बसची वाट पाहत आहेत. काही कळायच्या आतच पोलिसांचा ताफा बसस्थानकाचा ताबा घेतो. अन् तपासणी सुरू होते. अचानक सुरू झालेल्या या तपासणीमुळे प्रवासी काही काळ वैतागतात खरे.. पण अचानकपणे त्यांना समोर दिसतात ते काँग्रेसचे नेते, संसदेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी. अरे… खरच आपण त्यांना प्रत्यक्षपणे पाहत आहोत अन् तेही मध्यवर्ती बसस्थानकात… यावर अनेकांचा विश्वासच बसेनाच.  पण हे खरे होते संसदेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी गुरुवारी सायंकाळी नांदेड येथील नवीन मोंढा मैदानावरील सभा आटोपून सर्वसामान्य माणसांना भेटण्यासाठी थेट नांदेड मध्यवर्ती बस स्थानकात पोहोचले होते.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नांदेड येथील नवा मोंढा मैदानावरील सभा आटोपून थेट बसस्थानकाच्या दिशेने रवाना झाले. अचानक निघालेल्या या ताफ्याने शहरवासीय तसेच सुरक्षा यंत्रणांचीही तारांबळ उडाली. नांदेड मध्यवर्ती बस स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. प्रवासीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांच्या भेटीसाठी पुढे येत होते. हस्तांदोलन करत होते तसेच सेल्फीसाठीही त्यांची धडपड सुरू होती. संपूर्ण बस स्थानकात त्यांनी फेरी मारल्यानंतर ते प्रवाशांशी संवाद साधत बसस्थानक परिसरात असलेल्या नवनाथ रसवंती गृहात पोहोचले. रसवंती गृहात असलेल्या सामान्य नागरिकांसह रसवंती चालकासही त्यांना येणाऱ्या अडचणीविषयी चर्चा केली. त्यांच्या एकूण उत्पन्नाची माहिती घेतली. महागाईच्या काळात खर्चाची तडजोड करताना काय अडचणी येतात याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. रसवंती गृहातील महिलांशी त्यांनी आपुलकीने चर्चा केली. ही चर्चा करत असताना त्या महिलांना आपण खरेच स्वप्नात तर नाही ना… असा प्रश्न पडत होता मात्र सामान्यांचे नेते म्हणून राहुल गांधी यांची ओळख आज नांदेडमध्ये पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींनी सामान्य नागरिकांशी जोडलेले नाते आणखी घट्ट केले आहे. या यात्रेदरम्यान ते नांदेडमधूनही गेले होते. नांदेडमध्ये ते मुक्कामी होते. त्या दौऱ्यापेक्षा आजचा नांदेड दौरा हा अविस्मरणीय निश्चितच राहणार आहे. त्यांनी सामान्य नागरिकांशी थेट मध्यवर्ती बसस्थानकात जाऊन चर्चा केली.  ही चर्चा नांदेडकरांच्याही कायमची लक्षात राहणार आहे. ज्या प्रवाशांनी थेट राहुल गांधींशी संवाद साधला ते तर आपल्या जन्मभर हा संवाद विसरू शकणार नाहीत.

एकूणच नांदेड बसस्थानकातील प्रवाशांना राहुल गांधीच्या भेटीचा सुखद धक्का अनुभवास मिळाला यावेळी नांदेड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण हेही उपस्थित होते.

बुधवारी व्हिडिओ कॉलद्वारे साधला होता स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद…संसदेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बुधवारी नांदेडमधील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. नांदेड येथील महामंडळ मैदानावर होणाऱ्या सभेच्या स्वच्छतेचे काम सुरू असताना अचानक एक व्हिडिओ कॉल येतो आणि स्वच्छता करणाऱ्या महिलांना बोलावण्यात येते. त्यांना समोर दिसतात ते राहुल गांधी. राहुल गांधी यांनी त्यांची चौकशी केली. उषा गिरीधारी या महिलेची त्यांनी बातचीत केली. त्यावेळी महाराष्ट्रात आम्ही महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरू करत असून दरमहा ३ रुपये देण्यात येतील तसेच महिलांना बस प्रवास मोफत करण्याची सुविधा उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले. या संवादानंतर महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!