
नांदेड – देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर माझ्यासारख्या निस्वार्थ लोकांना निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शंकरराव जाधव यांनी केले. राजकारणात चांगल्या लोकांनी यावे असे बोलले जाते. मात्र त्यासाठी कोणीही पुढे येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन आपण राजकारणात एक चांगला उमेदवार म्हणून रिंगणात उतरलो आहे. त्यामुळे मतदार आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास श्यामसुंदर जाधव यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे जाधव यांना ओबीसी बहुजन आघाडी, जनहित लोकशाही पार्टी, मुस्लिम सेवा संघ आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने पाठिंबा दिला आहे.
सर्व नागरिकांची समान प्रगती झाली पाहिजे, या उद्देशाने नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात रिंगणात उतरलेल्या शामसुंदर जाधव यांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे. उद्योग धंदे नसतील तर प्रगती कशी होईल असा सवाल उपस्थित करताना रोजगार निर्मितीसाठी आपण काम करणार आहोत. उद्योगधंद्याला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील, महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठीही आपण पुढाकार घेणार आहोत, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठीही आपण प्रयत्न करणार आहोत. राजकीय पक्षांकडे तिकिटासाठी मोठी मारामारी असल्यामुळे आपण त्या कोणत्याही पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. एक चांगला उमेदवार म्हणून अपक्ष दावेदारी दाखल केली आहे. समाजकारणात नेहमी सक्रिय असल्याने मतदारांशी आपला चांगला संपर्क आहे. त्यामुळे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात आपल्याला यश मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड हे शैक्षणिक हब झाले आहे. त्यामुळे नांदेडमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि विशेष प्रोत्साहन दिले जाईल, अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आरोग्य सेवेमध्ये शासकीय रुग्णालयात आवश्यक सुधारणा करणे, नियमित आरोग्य शिबिर आणि जनजागृती मोहिमा आयोजित करण्याचाही आपला प्रयत्न राहणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने स्वयंसहायता गटांना विशेष प्रोत्साहन दिले जाईल तसेच महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास केंद्राची स्थापना आणि स्टार्टअप विशेष योजना सुरू केल्या जातील. नांदेड तहसीलचे विभाजन करून उत्तर- दक्षिण विभागात स्वतंत्र तहसील कार्यालय उभारण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे या सर्व विकास कामांसाठी नागरिकांनी मतदारांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या प्रगतीसाठी एक संधी द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नांदेडमध्ये काल बुधवारी आरक्षणवादी आघाडीने श्यामसुंदर जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. ते ओबीसी आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून नांदेड उत्तर मतदारसंघात निवडणूक लढवतील असे ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे. ओबीसी आरक्षणवादी आघाडीने राज्यात ८५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामध्ये १२ मुस्लिम आमदार असल्याचे शेंडगे यांनी स्पष्ट केले. ओबीसीच्या आरक्षणावर राज्यात दरोडा टाकण्यात आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सरकारनेही याला हातभार लावला आहे. आता दलितांचे आरक्षणही त्याच मार्गावर आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही मुस्लिमांना आरक्षण दिले नाही. त्यामुळे आम्ही सत्तेत येताच हे सर्व निर्णय बदलून टाकू असेही प्रकाश शेंडगे म्हणाले. यावेळी सुरेश माने, सुशीलकुमार जाधव, दत्तात्रय अनंतवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.