महापालिका

नांदेड महापालिकेचा थकीत पाणीकरासाठी पावडेवाडी बु. ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा

आजघडीला ५ कोटी २ लाख ७२ हजार ४३१ कोटी रुपयांचा पाणी कर थकला 

नांदेड –  शहरानजिक असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायतीला नांदेड महापालिकेच्यावतीने २०१४ पासून पाणीपुरवठा केला जातो. मात्र ग्रामपंचायतीला अनेकवेळा पत्र देऊनहीं ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक देयकाची रक्कम भरली जात नसल्याने पावडेवाडी ग्रामपंचायतला नांदेड महापालिकेने पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. पावडेवाडी ग्रामपंचायतीकडे दंडाच्या रकमेसह तब्बल ५ कोटी २ लाख ७२ हजार रुपये थकीत आहेत. आजच २८ नोव्हेंबर रोजी निवड झालेल्या नूतन सरपंच सांची गर्जे यांना हा प्रश्न आता प्राधान्याने सोडवावा लागणार आहे.

नांदेड महापालिकेच्या वतीने पावडेवाडी बु. ग्राम पंचायतीस २०१४ पासून पाणीपुरवठा केला जातो. मात्र पावडेवाडी ग्रामपंचायतीने महापालिकेची देयके देण्यास विलंब केला. वारंवार मागणी करूनही ही रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. देयकाची ही थकीत रक्कम आजघडीला ५ कोटी २ लाख ७२ हजार ४३१ रुपयांवर पोहोचली आहे. महापालिकेकडून विष्णुपुरी जलाशयातून जलसंपदा विभागामार्फत पाणी उचल करण्यात येते. यासाठी महापालिकेला देयक द्यावे लागतील. या देयकासाठी जलसंपदा विभागाकडून महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या सचिव स्तरावर पाणी देयकाच्या मागणीसाठी बैठका सुरू आहेत. असे असताना वारंवार मागणी करूनही  पावडेवाडी  ग्रामपंचायतीकडून महापालिकेला पाणीपुरवठ्याचे देयक अदा करण्यात अडचणी येत आहेत. पावडेवाडी ग्रामपंचायत माहे सप्टेंबर २०२४ पर्यंत चालू आणि थकीत देयक २ कोटी ७२ लाख ४६ हजार ४६ रुपये आणि करारनाम्याप्रमाणे दंडाची रक्कम २ कोटी ८९ लाख २६ हजार ३८५ रुपये अशी एकूण ५ कोटी २ लाख ७२ हजार ४३१ रुपये भरणा करण्याबाबत पत्र दिले आहे. त्याचवेळी पावडेवाडी बु. ग्रामपंचायतीनेही हमीपत्र दिल्यामुळे शासनाकडून प्राप्त अनुदानातून ही पाणीपट्टीची रक्कम त्वरित अदा करावी, अशी सूचना महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केली आहे.

ग्राम पंचायतीने दिले होते वर्षभरापूर्वी रक्कम भरण्याचे हमीपत्र…थकीत पाणीपुरवठासाठी महापालिकेने वाडी बु. ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा एप्रिल २०२३ महिन्यात थकीत देयकासाठी पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीने थकबाकीची रक्कम भरण्याची हमी दिली होती. ३० लाखांसह चालू थकबाकीची रक्कम चार महिन्यात पूर्ण भरू असे पत्रही ग्रामपंचायतने महापालिकेला दिले होते. मात्र ही रक्कम अद्यापही भरली नाही. तत्कालीन सरपंच वर्षा बुक्‍तरे व इतर सदस्यांनी हे पत्र महापालिकेला सुपूर्द केले होते. पावडेवाडी ग्रामपंचायतच्या नूतन सरपंचपदी आजच २८ नोव्हेंबर  रोजी सांची लक्ष्मण गर्जे यांची निवड झाली आहे. या महिला सरपंचांपुढे आता पाणीपुरवठ्याचे थकीत देयक भरण्याचे मोठे आव्हान उभे आहे. पावडेवाडी बु. ही जिल्ह्यातील सर्वात सर्वाधिक उत्पन्न असलेली ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. त्यामुळे  ग्रामपंचायतीने नियोजन करून ही रक्कम भरल्यास पावडेवाडीच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागू शकणार आहे. पाणी ही नागरिकांची अत्यावश्यक सेवा असताना पाणीपुरवठ्याचे देयक भरण्यात पावडेवाडी ग्रामपंचायतीने केलेले दुर्लक्ष हे गावकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!