
नांदेड – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात विविध संस्था, सामाजिक संघटना, पक्ष यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादनासाठी सकाळपासून रांगा लागल्या होत्या. त्याचवेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक संस्था, सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिर आयोजित करून आदरांजली अर्पण केली. या रक्तदान शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी सायंकाळी शहरातील अनेक भागातून पणती रॅली काढून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली.
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठी गर्दी केली होती. विविध पक्ष, संस्था, संघटनानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विविध शैक्षणिक संस्थांमध्येही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील अनेक भागातून गुरुवारी सायंकाळी पणती ज्योत रॅलीही काढण्यात आल्या. या पणती ज्योत रॅलीत अनेक महिला, बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अभिवादनासाठी रात्री उशिरापर्यंत आंबेडकर अनुयायी डॉ. आंबेडकर पुतळ्याकडे जात होते. पुतळा परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांचा जीवन प्रवास उलगडण्यात आला. या सांस्कृतिक कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायांनी चांगला प्रतिसाद दिला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या भीम अनुयायांनी पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी केली. त्याचवेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तसेच तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्यांची खरेदी अनेक नागरिकांनी यावेळी केली. पुतळा परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक थांबवली होती. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवला होता.
व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. या अभिवादन सभेस राज्य सरचिटणीस श्रीनिवास भोसले, जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी, रमेश सोनाळे, सूर्यकुमार यन्नावार, सुरेश आंबटवार, शरद काटकर, ऋषिकेश कोंडेकर, अविनाश चमकुरे, अविनाश पाईकराव, डॉ. भगवान सूर्यवंशी, डॉ. प्रवीण सेलूकर, प्रा. राज गायकवाड आदींची उपस्थिती होती.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनेही भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक रविंद्र संगनवार, निमंत्रक ॲड. प्रदीप नागापूरकर, पत्रकार परिषदेचे माजी संघटक प्रकाश कांबळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव राम तरटे, प्रसिध्दी प्रमुख माधव गोधणे, लक्ष्मण भवरे, महानगर सरचिटणीस सुरेश काशिदे, उपाध्यक्ष प्रल्हाद लोहेकर, प्रशांत गवळे आदींची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करा- पोलीस अधीक्षक अविनाश कुमार…महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आज भारतातच नव्हे तर जगामध्ये ओळखले जाते. बाबासाहेबांचा जीवनप्रवास, त्यांनी समानतेसाठी दिलेला लढा हा आजही अजरामर आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या तत्त्वांचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे. त्याचवेळी बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर युवकांनी तसेच समाजातील प्रत्येक घटकाने वाटचाल करावी, असे आवाहनही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले.