
नांदेड – नांदेड महापालिकेत उपायुक्त म्हणून सुप्रिया टवलारे या ६ नोव्हेंबर रोजी रुजू झाल्या. त्यांच्याकडे आस्थापना व सामान्य प्रशासन विभागासह इतर सात विभागांची जबाबदारी सोपविणे सोपविली आहे. त्याचवेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांनाही त्यांचे मूळ काम सांभाळून प्रभारी उपायुक्त म्हणून पदभार देण्यात आला आहे. तर कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त मनीषा नरसाळे यांनाही उपायुक्त (विकास) या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार सुप्रिया टवलारे या नांदेड महापालिकेत उपायुक्त म्हणून सहा नोव्हेंबर रोजी रुजू झाल्या. त्यांच्याकडे आस्थापना व सामान्य प्रशासन विभाग तसेच जनगणना विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, बी.एस.यु.पी. विभाग, निवडणूक विभाग आणि स्टेडियम विभाग या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासोबतच सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांना अतिरिक्त पदभार देताना त्यांना वजीराबाद क्षेत्रीय कार्यालयाचा मूळ पदभार सांभाळून घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता विभाग, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, भांडार विभाग, भूसंपादन विभाग, वाचनालय विभाग, स्थानिक संस्था कर विभाग, दिव्यांग कल्याण कक्ष आणि कोंडवाडा विभागाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त संजय जाधव हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना प्रभारी उपायुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचवेळी उपायुक्त पदावरील पदोन्नतीसाठी ते लवकरच पात्र होतील, याबाबतही हालचाली सुरू आहेत.
महापालिकेत कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्त (कर) मनीषा नरसाळे यांनाही प्रशासकीय कारणास्तव उपायुक्त विकास या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या उपायुक्तांसह आता महापालिकेत दोन अतिरिक्त उपायुक्तही जबाबदारी सांभाळणार आहेत. प्रभारी उपायुक्त मनीषा नरसाळे आणि नूतन उपायुक्त सुप्रिया टवलारे यांच्यावर आता निवडणुकीचीही जबाबदारी आली आहे. त्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात काम पाहत आहेत.