क्राईम

वाळूमाफियांवर नांदेड ग्रामीण आणि सोनखेड हद्दीत पोलिसांची कारवाई, लिंबगाव ठाणे हद्दीत मात्र मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू

तीन हायवा, एका जेसीबीसह ९५ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल 

नांदेड – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असताना महसूल विभागाकडून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र आता पोलिसांकडून वाळू माफियांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तीन दिवसात नांदेड ग्रामीण आणि सोनखेड पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून ९५ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात चालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असले तरी मूळ वाळूमाफिया कारवाईपासून दूरच राहिले आहेत.

सोनखेड पोलीस ठाणे हद्दीत ६ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दगडगाव पॉईंट येथे अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांना मिळाली.  या अवैधरित्या वाळू चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस तात्काळ तेथे पोहोचले. पोलिसांनी एम एच ४६ ए एफ ८३१३ क्रमांकाची हायवा ट्रक थांबून तपासली असता या हायवामध्ये अवैधरित्या उपसा केलेली पाच ब्रास वाळू आढळली. या पंचवीस हजार रुपयांच्या वाळू चोरी प्रकरणी सोनखेड पोलिसांनी हायवा चालक मारुती लक्ष्मण चव्हाण रा.  हिराबोरी तांडा ता. लोहा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रेतीसह २१ लाख रुपये किंमतीची हायवा  ट्रक जप्त केली आहे.अन्य एका कारवाईत सोनखेड पोलिसांनीच ८ डिसेंबर रोजी रात्री दगडगाव वाय पॉईंट ता. लोहा येथे आणखी एक कारवाई केली. अवैधरित्या वाळूची चोरी करून एमएच ४६ एएफ ८३१२ क्रमांकाच्या हायवा ट्रकमधून नेली जात होती. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदर ट्रक पकडला. या ट्रकमध्ये  पंचवीस हजार रुपये किंमतीची पाच ब्रास वाळू होती. वाहन आणि वाळू जप्त करण्यात आली. याप्रकरणी रमेश चंदू वाघमारे रा. आंबेसांगवी, ता. लोहा या हायवाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनखेड पोलीसांपाठोपाठ नांदेड ग्रामीण पोलिसांनीही अवैध वाळू उपसा आणि अवैध वाहतुकीसंदर्भात कारवाई केली आहे. ७ डिसेंबर रोजी गंगाबेट शिवारात पहाटे पाच ते सहा वाजेदरम्यान अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी पोहोचून पाहणी केली असता दोन हायवा ट्रक आणि एका जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू साठवून चोरटी विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गजानन मुरलीधर कदम रा. शेलगाव, ता. लोहा, त्र्यंबक रामराव पाटील रा. बोरगाव, ता. लोहा आणि कृष्णा भिवाजी वानखेडे रा. बेटसांगवी, ता लोहा जिल्हा नांदेड या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. नांदेड ग्रामीण पोलिसांनी या कारवाईत ३६ हजार रुपयांची सहा ब्रास रेती, दोन हायवा ट्रक आणि एक जेसीबी असा एकूण ४९ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही कारवाईत हायवा चालक आणि जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असले तर या प्रकरणातील मूळ मालक कोण आहेत याचा तपास मात्र लागला नाही. अवैध वाहतूक करण्यासाठी या हायवाचा वापर होत आहे.  मात्र ते कोणासाठी काम करत आहेत याचा शोधही पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
सोनखेड पोलीस आणि नांदेड ग्रामीण पोलिसांनी सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखालील केली आहे. या कारवाईत सोनखेड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गीते, पोहेकॉ विश्वनाथ हंबर्डे, पोना सिद्धार्थ वाघमारे यांच्यासह नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोहेकॉ पांचाळ, सवनकर, पोना माधव डफडे यांचा सहभाग होता.

नाळेश्वर महसूल मंडळात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरूच…अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध सोनखेड आणि नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर या ठाणे हद्दीत अवैध वाळू उपसा आणि वाहतूक गेल्या तीन दिवसापासून बंद आहे. दुसरीकडे लिंबगाव ठाणे हद्दीतील वाळू उपसा मात्र मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. लिंबगाव पोलिसांनी या प्रकरणात का डोळेझाक केली असावी हे मात्र अनाकलनीय आहे. नाळेश्वर महसूल मंडळात सोमेश्वर भनगी, वाहेगाव, मोहनपुरा, रहाटी, थुगाव या गोदाकाठच्या गावात मशिनद्वारे वाळू उपसा सुरूच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!