
नांदेड – नांदेड महापालिकेने मालमत्ता कर थकीत असलेल्या २० हजार मालमत्ताधारकांना नोटीस बजावली असून या मालमत्ताधारकांना १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीत मालमत्ता कराच्या थकबाकीवरील ८० टक्के सूट दिली जाणार आहे. या एक दिवसीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
नांदेड महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांकडे जवळपास २५० कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे. हा थकित कर वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. थकीत मालमत्ताधारकांकडून कर वसुलीसाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्या वतीने १४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महापालिकेच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीच्या अनुषंगाने मालमत्ताकर थकीत असलेल्या शहरातील २० हजार मालमत्ताधारकांना महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. राष्ट्रीय लोक अदालती दरम्यान मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीत ८० टक्के सूट देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे. त्याचवेळी योजनेचा लाभ मालमत्ताधारकांना मिळावा यासाठी क्षेत्रीय कार्यालयामार्फत योजनेची माहिती थकबाकीदारांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे.
राष्ट्रीय लोक आदालतीच्या दिवशी थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांनी थकबाकीसह साल २०२४-२५ च्या पूर्ण मालमत्ता कराचा भरणा केल्यास अशा मालमत्ता कराच्या थकबाकीवरील ८० टक्के सूट मिळणार आहे. ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्ताकराचा भरणा केलेला नाही त्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १४ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महापालिका मुख्य कार्यालयात संबंधित वसुली लिपिकांकडे किंवा ऑनलाईन पद्धतीने महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा करून या ८० टक्के सूट योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मालमत्ता कराचा भरणा न केल्यास आगामी काळात थकबाकीदार मालमत्ताधारकांविरुद्ध ड्रेनेज व नळ खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्या नियंत्रणाखाली सहाय्यक आयुक्त मनीषा नरसाळे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, विभाग प्रमुख, सर्व वसुली निरीक्षक, वसुली लिपिक आणि कर संकलन विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत.