
नांदेड :- महापालिकेने कर वसुली मोहीम सुरू केली आहे. कर वसुलीसाठी आता महापालिका ॲक्शन मोडवर आली असून याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या जप्ती पथकाने वजीराबाद व अशोकनगर झोनमध्ये गुरुवारी जप्तीची धडक कारवाई केली आहे. एक भूखंड जप्त केला असून एका मालमत्तेवर अटकाव आणला आहे.
थकीत कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (कर) स.अजितपालसिंग संधु व सहा-आयुक्त मनिषा नरसाळे यांच्या नियंत्रणाखाली कर वसुलीसाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास जप्ती व वसुलीसाठी उद्दिष्ट दिलेले आहे.
१९ डिसेंबर रोजी क्षेत्रिय कार्यालय क्र.४ वजीराबाद अंतर्गत मालमत्ताधारक त्रिंबक माणिकराव लाठकर / शेख खय्युम शेख महेबुब या मालमत्ता धारकांकडून करापोटी ३२ लाख २२ हजार ९०३ रुपये एवढी रक्कम येणे शिल्लक असल्या कारणाने सदरील कराची रक्कम भरण्यासाठी असमर्थता दर्शविल्यामुळे संबंधित मालमत्ताधारकांची मालमत्ता अटकावुन ठेवण्यात आली आहे. सदरील कार्यवाही क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे यांचे अधिनिस्त वसुली पथकातील कर निरिक्षक आशीर्वाद चव्हाण, वसुली लिपिक इर्शाद अली, लखन कुंटे व वसुली सहाय्यक सय्यद तुराब, शुभम कागडा, अनिल लोखंडे यांनी पार पाडली आहे.
क्षेत्रिय कार्यालय क्र.२ अशोकनगर अंतर्गत मालमत्ताधारक राजेंद्र नथमल मुंदडा रा. विसावानगर या मालमत्ता धारकांकडून ५ लाख ९ हजार ७७३ रुपये एवढी मालमत्ता कराची रक्कम येणे बाकी होती. परंतु सदरील कराची रक्कम भरण्यासाठी असमर्थता दर्शविल्यामुळे संबंधिताचा मोकळा भुखंड जप्त करण्यात आला आहे. सदरील कार्यवाही क्षेत्रिय अधिकारी राजेश जाधव, कर निरिक्षक रणजीत पाटील, ओमकार स्वामी, दिपक पाटील, बालाजी लंकवाडे यांनी कार्यवाही पार पाडली आहे.
शास्तीच्या रक्कमेत ८० टक्के सूट योजनेचा शुक्रवारी शेवटचा दिवस..! महापालिका हद्दीतील मालमत्ताधारकांनी आपला चालु व थकीत कराचा भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे व मालमत्ता जप्ती सारख्या अप्रिय घटना टाळाव्यात असे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांनी केले आहे. तथापि नागरिकांनी आपल्या थकीत मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा केल्यास शास्तीच्या रक्कमेत ८० टक्के सूट या योजनेचा उद्या शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, १४ डिसेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत ३१०० मालमत्ता धारकांनी थकबाकीवरील शास्तीत ८० टक्के सुट योजनेचा लाभ घेत ५ कोटी ७२ लाख ३६ हजार ८६२ रुपये इतका मालमत्ता कराचा भरणा केला. शास्ती माफी योजनेस नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता थकबाकीवरील शास्ती माफीमध्ये ८० टक्के सूट योजनेस महापालिकेने २० डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही अंतिम मुदतवाढ असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या स्पष्ट केले आहे.