
नांदेड – जिल्ह्यात खुलेआम मटका, दारू, जुगार अड्डे सुरू असल्याची टीका माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी रविवारीच केली होती. आता जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सुरू असलेल्या अवैध क्लबचा विषय विधानसभेत मांडू, असा इशारा देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी दिला आहे. देगलूर, बिलोली, धर्माबाद या सीमावर्ती तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्लब सुरू आहेत. या क्लबमध्ये तेलंगणा, कर्नाटका राज्यातून मोठ्या प्रमाणात जुगारी येत आहेत. येथे अवैधरित्या लाखो रुपयांची उलाढाल दररोज होत आहे. सामान्य नागरिक या जुगार आणि क्लबच्या माध्यमातून देशोधडीला लागत आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच मोठ्या प्रमाणात हे क्लब सुरू आहेत, असा आरोप करण्यात येत आहे.
बिलोली येथील शासकीय गायरान जमीन, येसगी येथील पाच ते सहा एकरमध्ये एका व्यक्तीने पत्र्याचे शेड मारले आहे. दिवसाकाठी दहा लाखांची ‘केटी’ येथे वसूल केली जाते. त्यावरून येथे जुगाराची होणारी उलाढाल लक्षात येते. या जुगाराच्या अड्ड्यांवर स्थानिक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही हे विशेष. मांजरा नदीकाठी ही जागा असून बाजूलाच शासकीय वाळू डेपो आहे. येथे मोठ्या प्रमाणात महसूल, पोलीस अधिकाऱ्यांची ये जा असते. मात्र या जुगाराकडे ‘अर्थ’पूर्ण कानाडोळाच केला जातो. या ठिकाणी तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात जुगारी येत असतात. मोठमोठ्या वाहनातून हे जुगारी येथे क्लबमध्ये येत असतात. या ठिकाणी जुगाऱ्यांना आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कमाईच्या नादात अनेक गरीब नागरिकही या अड्ड्यावर येऊन आपली घामाची कमाई गमावत असतात.
बिलोली तालुक्यात चार ते पाच ठिकाणी मोठमोठे क्लब सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. येसगी येथे हैदराबाद रस्त्यावर गायरान जमिनीवरही क्लब चालवला जातो. बोधन रस्त्यावर एका धार्मिक स्थळाच्या बाजूला क्लब चालू आहे. त्याच वेळी कार्ला फाटा येथेही एका इंग्रजी शाळेसमोर असलेल्या हॉटेलमध्ये अवैध क्लबच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते. आरळी रस्त्यावरही एका मंगल कार्यालयाजवळ क्लब सुरू असून येथे मोठ्या प्रमाणात जुगाराचा अड्डा चालविण्याची चालविण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सगरोळीतही एका बड्या वाळू ठेकेदाराकडून क्लब चालवला जात आहे.
दुसरीकडे देगलूर येथे लेंडी नदीकाठावर तालुका क्रीडा संकुलाच्या बाजूस एका आलिशान फार्म हाऊसवर क्लब चालवला जातो. या क्लब मध्येही मोठमोठे जुगारी येत असतात. या जुगाऱ्यांना खान पानापासून आवश्यक ती सर्व सुविधा याच क्लबमध्ये उपलब्ध होत असते. या अवैध क्लबच्या माध्यमातून हे क्लब चालक लाखोंची कमाई करत आहेत. मात्र सामान्य नागरिक देशोधडीला लागत आहे. बिलोली आणि देगलूर तालुक्यातील या अवैध क्लब तसेच धंद्याबाबत नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षकांकडेही तक्रार करून हे क्लब आणि अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड पोलीस अधीक्षकांशी चर्चा करू…देगलूर – बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध आपण कारवाईची मागणी केली असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत नांदेड पोलीस अधीक्षक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षकांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काळात देगलूर आणि बिलोली तालुक्यातील या अवैध धंद्यावर पोलीस विभागाकडून कारवाई होईल का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. सीमावर्ती तालुक्यात अवैध क्लब, जुगार अड्ड्यांच्या माध्यमातून सुरू असलेली लाखोंची कमाई थांबविण्यात यश येणार का हेही पहावे लागणार आहे.