
नांदेड – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे तर जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार आणि आमदार ॲड. श्रीजया चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा आता अशोकराव थेटपणे अंमलात आणू शकणार आहेत. त्याचवेळी चव्हाण यांना निवडणुकीतबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत का? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनाही आता भाजपाने थेटपणे उत्तर देत निवडणुकीची सर्व सूत्रे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हाती सोपविले आहेत.
नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला जवळपास तीन महिन्यापूर्वीच प्रारंभ करण्यात आला होता. या निवडणुकीच्या तयारीच्या प्रारंभीपासूनच माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी स्वबळाचा नारा लावला होता. त्यादृष्टीने त्यांचे नियोजनही सुरूच होते; मात्र महायुतीतील काही नेते चव्हाणांच्या निर्णय घेण्याच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत होते. महायुती किंवा स्वबळाचा नारा हा पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील, स्थानिक पातळीवरील नेत्यांना तो अधिकार आहे का? असे ते जाहीरपणे बोलून दाखवत होते. यातून ते चव्हाण यांनाच पक्षीय पातळीवर कमी लेखण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर महायुती करण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल, हे वारंवार सांगितले होते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत स्पष्टता आणत स्थानिक नेतेच महायुतीचा निर्णय घेतील असे निवडणूक तयारीच्या बैठकांमध्ये वारंवार सांगत होते. त्याच दृष्टीने आता भारतीय जनता पक्षाने मोठे पाऊल टाकले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून नांदेड शहराची जबाबदारी खासदार डॉ. अजित गोपछडे यांना तर नांदेड उत्तरच्या निवडणूक प्रमुख म्हणून ॲड. श्रीजया चव्हाण यांना जबाबदारी दिली आहे. नांदेड दक्षिणचे निवडणूक प्रमुख हे राज्य आमदार राजेश पवार हे राहतील. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन खासदार आणि दोन आमदार हे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची संपूर्ण रणनीती आखतील हे स्पष्ट झाले आहे. या सर्वांचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण करतील हीच बाबा आता पक्षपातळीवरही स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आली आहे. यातून नांदेड जिल्ह्यात महायुतीतील वाचाळवीरांना मोठी चपराक मिळाली आहे. त्यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची नियुक्ती ही अपेक्षित असली तरीही त्यांच्या कन्या आमदार ॲड. श्रीजया चव्हाण यांनाही निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेत थेट सामावून घेत चव्हाण यांना भारतीय जनता पक्षाने मोठे बळच दिले आहे.



