नांदेड- जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समाजमाध्यमातून उभे केले जाणारे चित्र चुकीचे, निराधार व तर्कहिन आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील महायुतीमध्ये एकजूट असून, नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. उलटपक्षी महाविकास आघाडी हताश, दिशाहिन व खिळखिळी झाली आहे. त्यातूनच कदाचित अशा बातम्या जन्मास आल्या असाव्यात, असे मत भाजपचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी व्यक्त केले आहे.
राज्य पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तिघेही एकत्रितपणे काम करीत आहेत. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या १०० दिवसांची रुपरेखा निश्चित करून त्यानुसार प्रभावीपणे काम सुरु झाले आहे. त्यामध्ये खा. अशोकराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारला जात असलेल्या जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या विस्तारित प्रकल्पाला गती देण्याचाही समावेश आहे. राज्यात एकत्रित काम करण्याचा महायुतीचा सूर नांदेड जिल्ह्यातही दिसून येतो. जिल्ह्यातील महायुतीची एकजूट कायम रहावी, असा आग्रह धरून भाजपचे खा. अशोकराव चव्हाण काम करत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांवर येणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे पांडागळे यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे नेते हवेत राहिले. तर दुसरीकडे महायुतीने लोकसभेत राहिलेल्या उणीवा दुरुस्त करून विधानसभा निवडणूक ताकदीने लढवली. निवडणुकीपूर्वी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले, त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली. तीनही पक्ष एकसंघ व मजबुतीने निवडणुकीला सामोरे गेले. त्याचीच फलश्रुति म्हणून महायुतीने विधानसभेच्या सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची व प्रमुख कार्यकर्त्यांची महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तीनही प्रमुख पक्षांमध्ये इनकमिंग सुरु झाली आहे. त्या माध्यमातून महायुतीतील घटकांचे स्थानिक पातळीवरील नेतृत्व मजबूत होते आहे. याच निराशेतून कदाचित काही घटकांनी जाणीवपूर्वक महायुतीतील मतभेदांच्या बातम्या जन्मास घालण्याचा उद्योग सुरु केले असावेत, अशीही शंका पांडागळे यांनी व्यक्त केली.
महायुतीत मंत्रिपदावरून धुसफूस… त्यात राजूरकरांनीही दिला तडका..! नांदेड जिल्ह्याचे विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. सर्व नऊच्या नऊ विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपाचे पाच, शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. मात्र असे असतानाही नांदेड जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळाले नाही. मंत्रीपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह शिवसेनेचे हेमंत पाटील हे होते. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र जिल्ह्यात एकही मंत्रीपद मिळाले नाही. अंतर्गत वादातूनच किंवा मला नाही तर कुणालाही नाही या विचारातूनच जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीतील तीनही पक्षाची तोंडे तीन बाजूला सध्या तरी स्पष्टपणे दिसत आहे. त्यात शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत नांदेडमध्ये झालेल्या अनेक कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनाच टार्गेट केले आहे. एप्रिल २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत चिखलीकरांच्या पराभवाचे ही कवित्व अजून सुरूच आहे. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ही भाजपचे उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे हेही पराभूत झाले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे केंद्रातील मंत्री पद हुकले, हेही सर्वश्रुत आहे. ही सर्व खदखद असताना कंधार दौऱ्यात माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांनी एकाच घरात दोन पक्ष नको म्हणत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेतील युद्धाला तोंड फोडले आहे. त्याला आ. चिखलीकर यांनीही तोडीस तोड उत्तर दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीत सर्व काही आलबेल आहे, असे चित्र सध्यातरी दिसत नाही. आता नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळते, यावरही अनेक राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे येथे भाजपचाच पालकमंत्री होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात भाजपचे पारडे निश्चितच वरचढ होणार आहे. त्यातून महायुतीतील अंतर्गत रस्सीखेच निश्चितच सुरू होईल.