राजकीय

मनोहर शिंदेची पुन्हा पलटी, बस्वदे, काकडेही भाजपात

भाजपाचे पुन्हा एकदा प्रवेश सोहळे सुरू, काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, राष्ट्रवादी काँग्रेसचे जाळे तयार..!

नांदेड –  भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात पुन्हा एकदा पक्ष प्रवेश सोहळ्याना प्रारंभ केला आहे. तर काँग्रेसला आता नव्याने गळती लागली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे व गंगाप्रसाद काकडे यांच्यासह नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ तसेच ग्रामीण भागातील अनेक सरपंचांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवून बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यात मनोहर शिंदे यांची कोलांटउडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी वाजेगाव जि.प. सर्कलचे माजी सदस्य मनोहर पाटील शिंदे, बळीरामपूर जि.प. सर्कलचे माजी सदस्य गंगाप्रसाद काकडे यांच्यासह काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाचे अनेक सरपंच, माजी सरपंच, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. महाविकास आघाडीतून सध्या मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु असून शिंदे, काकडे देखील महायुतीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. ते नेमके कोणत्या पक्षात जाणार, याविषयी वेगवेगळे कयास लावले जात होते. भाजप नेते व माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचेच नेतृत्व त्यांनी स्वीकारले आहे. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी नगरसेवक बालाजी जाधव, अमित तेहरा, राजू पाटील काळे, संजय मोरे, उदय देशमुख, सिद्धार्थ गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या पक्ष प्रवेश सोहळ्यात गोपाळचावडीचे माजी सरपंच साहेबराव सेलुकर, धनेगावचे सरपंच गंगाधर ऊर्फ पिंटू पाटील शिंदे, बाभुळगावचे सरपंच पुंडलिक मस्के, वांगीचे सरपंच दता पाटील जाधव, पिंपळगाव मिश्रीचे सरपंच माधव‌ पाटील पुयड, कल्हाळचे विठ्ठल कळके, पांगरीचे हनमंत ‌घोगरे, गाडेगावचे संदीप धुमाळे, माजी सरपंच मारोतराव संगेकर, आनंदराव अवातिरक माजी सरपंच सिद्धनाथ, वांगीचे माजी सरपंच गोविंदराव जाधव, पंचायत समिती सदस्य गंगाधर नरवाडे,  नागोराव जाधव माजी उपसरपंच वांगी, बबन‌ मेकाले माजी उपसरपंच पांगरी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी सतिश बस्वदे, रमेश तालीमकर, चिमणाजी पाटील कदम, राजेश बोटलावार, शंकर‌ शिंदे, गंगाधर देशमुख, राष्ट्रवादीचे गंगाधर कवाळे‌ यांनी भाजपात प्रवेश केला.

जिल्ह्यात नेत्यांच्या कोलांटउड्या सुरूच…नांदेड जिल्ह्यात नेत्यांच्या कोलांटउड्या सुरूच आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपासून या कोलांटउड्यांना प्रारंभ झाला आहे. अगदी बड्या नेत्यापासून ते सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पक्ष बदलाचा हा फंडा सुरूच आहे. लोकसभा कालावधीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र लोकसभेत नांदेडची जागा काँग्रेसने जिंकल्यानंतर पुन्हा नांदेड जिल्ह्यात भाजपात प्रवेश केलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसची वाट धरली. पुढे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठे राजकीय परिवर्तन घडले. विधानसभेला भाजपाने महायुतीमध्ये मोठे यश मिळवत नऊच्या नऊ जागी विजय मिळवला. त्यामुळे आता भाजपामधून काँग्रेसमध्ये गेलेले नेते, कार्यकर्ते आता पुन्हा एकदा परतीची वाट धरत भाजपमध्ये येत आहेत. असाच प्रवेश मनोहर शिंदे यांचाही आज बुधवारी झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!