
नांदेड – काँग्रेसचे नांदेड उत्तरचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांनी आपल्या पदासह प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देऊन राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी मुंबईमध्ये माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, शिवराज पाटील होटळकर, मुक्तेश्वर धोंडगे आदी बडी मंडळी उपमुख्यमंत्री अजित दादांच्या भेटीस पोहोचले आहेत. या सर्वांची भेट घडवणारे लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हेही या भेटीप्रसंगी उपस्थित होते. त्यामुळे या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित मानले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ आणि १९ जानेवारी रोजी शिर्डी येथे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात हे प्रवेश होतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर महायुतीने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रवेश सोहळे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. महायुतीतच आता पक्ष प्रवेश सोहळ्याची स्पर्धा लागली असल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व प्रकारात काँग्रेसच्या गडाला मात्र हादरे बसणे सुरूच आहे. कितीही नेते गेले तरी काँग्रेसचा किल्ला मजबूत राहिल असे सांगणारे जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि खासदार प्रा. रवींद्र चव्हाण हे हादरे थांबविण्यासाठी काय करू शकतील याकडेही लक्ष लागले आहे. गुरुवारी
नांदेड उत्तरचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांनी काँग्रेस कार्याध्यक्षपदासह प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे. ते आता लवकरच राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत. गुरुवारी रावणगावकर यांनी भोकर तालुक्यातील आपल्या समर्थकांची बैठक घेऊन हा निर्णय घोषित केला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या पडझडीनंतर हा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भोकर तालुक्यातील या राजकीय घडामोडीनंतर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांच्या गडात हात घातल्याचेच स्पष्ट होत आहे. त्याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची गुरुवारी मुंबई येथे मंत्रालयात नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, माजी जिल्हा परिषद सभापती शिवराज पाटील होटाळकर, ॲड. मुक्तेश्वरराव धोंडगे, नांदेड महानगर पालिकेचे माजी उपमहापौर सरजितसिंघ गिल, माजी सभापती अशोक पाटील मुगावकर आदींनी भेट घेतली. ही भेट जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होणार असल्याचे संकेत देणारी ठरली आहे.
राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे अधिवेशन शिर्डी येथे १८ आणि १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात नांदेड जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार आहेत. माजी खासदार तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली हे प्रवेश घडवून आणले जात आहेत. एकीकडे भारतीय जनता पक्षाकडून कंधार आणि लोहामध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना शह देण्याचा प्रयत्न केला जात असताना आमदार चिखलीकर यांनी जिल्हास्तरावरच मोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात त्यांना यशही येत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी व्यंकटराव गोजेगावकर यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
जिल्ह्यात महायुतीतील नेत्यांमध्येच नेतृत्वाची लढाई सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. महायुतीतील नेते कोण्या एका नेत्याचे नेतृत्व मान्य करण्यास तयार झालेले दिसत नाहीत. उलट आपला पक्ष सक्षम करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातून टीका टिप्पणीही केल्या जात आहेत. या टीका टिप्पणी थेट नाव घेऊन तर कधी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केली जात आहे. आगामी काळात ही लढाई थेटपणे होण्याचे चित्र ही निर्माण होत आहे.
माजी आमदार मोहन अण्णांच्या प्रवेशाबाबत शुक्रवारी निर्णय होणार…नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे. मात्र त्यांच्या वाटेत शहराध्यक्ष जीवन घोगरे यांनी अडथळे आणल्याचेच गेल्या काही दिवसातील घडामोडीवरून स्पष्ट झाले आहे. मात्र जीवन घोगरे आणि मोहन अण्णा हंबर्डे यांच्यातील वितुष्ट संपुष्टात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मोहन अण्णा हंबर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश शुक्रवारी निश्चित होईल, असे सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी घोगरे हंबर्डे हा वादही जवळपास संपुष्टात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब होईल काय हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.