राजकीय

भारतीय जनता पक्षाच्या नांदेड महानगर कार्याध्यक्षपदी अमरनाथ राजूरकर यांची निवड; मिलिंद देशमुख यांच्यासाठीही भाजपाच्या पुन्हा पायघड्या..! 

नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने आखली रणनीती, राजुरकरांवर मोठी जबाबदारी, कंदकुर्तेंच्या भाजपा प्रवेशाचीही झाली आता चर्चा सुरू

नांदेड – विधानसभा निवडणुकीत दिलीप कंदकुर्ते यांच्या बंडखोरीने रिक्त झालेल्या भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष पदाची माळ अमरनाथ राजूरकर यांच्या  गळ्यात पडली आहे. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे मिलिंद देशमुख यांनाही भाजपाने पुन्हा एकदा पक्षामध्ये प्रवेश दिला आहे. त्यामुळे मिलिंद देशमुख यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध करणाऱ्यांना भाजपातील प्रमुख मंडळींना मोठी चपराक बसली असून आता दिलीप कंदकुर्ते यांनाही पक्षात प्रवेश मिळेल का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपवर पूर्णतः पकड घट्ट केल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाचा नेता कोण प्रतापराव पाटील चिखलीकर की अशोकराव चव्हाण याबाबत चर्चा सुरू झाली होती; पण लोकसभा निवडणुकीत पराभव होताच चिखलीकर यांनी अशोकराव चव्हाण हेच आपले नेते असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत लोहा मतदारसंघातील तिकिटासाठी  चिखलीकर यांनी भाजपाला जय श्रीराम करत अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची संपूर्ण सूत्रे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हाती पक्षाने सोपविली. विधानसभा निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले. त्यासोबतच महायुतीच्या सर्वच्या सर्व नऊ उमेदवारांनाही यश मिळाले.  परिणामी अशोकरावांचे भाजपातील महत्त्व अधोरेखीत झाले. आता अशोकराव चव्हाण यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष घातले आहे. यासाठी ते जिल्हाभर बैठका घेत आहेत. नांदेड महापालिकेच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. या निवडणुका जिंकण्यासाठी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आतापासूनच इच्छुकांनी तसेच माजी नगरसेवकांनी पुढे यावे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.  परिणामी भारतीय जनता पक्ष आता पूर्ण क्षमतेने नांदेड महापालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे. मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे राईट हॅन्ड असलेले अमरनाथ राजूरकर यांच्या हाती भाजपा महानगराची धुरा आज मंगळवारी सोपविण्यात आली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसारच ही निवड भाजपाने केली आहे. आगामी सर्व निवडी या आता अशोकराव चव्हाण यांच्या आदेशावरूनच होतील, हे महानगर अध्यक्ष पदाच्या निवडीवरून स्पष्ट झाले आहे.
भारतीय जनता पक्षात महानगराध्यक्ष पदासाठी अनेक चेहरे इच्छुक होते. त्यामध्ये विजय गंभीरे, बाळू खोमणे, किशोर स्वामी, अमित तेहरा यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र त्यावर मात करत राज्य उपाध्यक्ष असलेले अमरनाथ राजुरकर यांना महानगर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आता अमरनाथ राजुरकर हे भाजपाच्या महानगराध्यक्षाची धुरा सांभाळताना आगामी महापालिकेच्या निवडणुकांची रणनीतीही निश्चित करतील हे स्पष्ट झाले आहे. राजूरकर यांना मुंबईत ही नियुक्ती देण्यात आली.
भाजप महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या नियुक्ती सोबतच विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघात बंडखोरी करणारे मिलिंद देशमुख यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. देशमुख यांच्या पुनर्प्रवेशासाठी अनेकांनी विरोध केला होता मात्र हा विरोध मोडून काढत पुन्हा एकदा मिलिंद देशमुख यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला आहे. आता आगामी काळात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणारे दिलीप कंदकुर्ते यांनाही भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळेल का याकडेही लक्ष लागले आहे.
राजूरकरांच्या निवडीचा नांदेडमध्ये जल्लोष… आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्‍चभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या शिफारशीनुसार विधान परिषदेचे माजी गटनेते व प्रदेश भाजपाचे राज्य उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांची भारतीय जनता पक्षाच्या नांदेड महानगर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचे वृत्त धडकताच येथे २१ जानेवारी रोजी मोठा जल्लोष करण्यात आला. माजी महापौरांचे प्रतिनिधी विजय येवनकर यांच्या पुढाकारातून येथील आयटीआय चौकात फटाक्यांची अतिषबाजी करून पेढे वाढण्यात आले. यावेळी माजी महानगराध्यक्ष प्रविण साले, भाजपाचे प्रवक्ते संतोष पांडागळे, सरचिटणीस विजय गंभीरे, लक्ष्मीकांत गोणे, किशन कल्याणकर, सदाशिव पुरी, नागनाथ गड्डम, दिपक पाटील, कामाजी सरोदे, बागड्या यादव, मनोज जाधव, अमित वाघ, साहेबराव  गायकवाड, गोपी मुदिराज, शशीकांत क्षीरसागर, शाहू महाराज, सिध्दार्थ धुतराज, धीरज स्वामी, गणेश स्वामी, सुयोग कवडगी, अक्षय अमिलकंठवार किरण शिंदे इत्यादी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!