प्रशासकीय

..अखेर नांदेडचे ‘ते’ दोन पोलीस अंमलदार निलंबित..!

शासकीय रुग्णालयात हल्ला प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठेवला ठपका, विभागीय चौकशीही झाली सुरू, भाग्यनगर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षकांनाही बजावली कारणे दाखवा नोटीस..!

नांदेड – विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या खून प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. नांदेड शहरातील भारत ई-स्क्वेअरजवळ दोन गटात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या सय्यद आवेज याच्यावर अर्जितसिंघच्या भावाने शासकीय रुग्णालयात चाकूहल्ला केला होता. यावेळी उपस्थित पोलिसांनी हल्ला रोखण्यासाठी अपेक्षित तत्परता दाखवली नसल्याचे निलंबन आदेशात स्पष्ट केले आहे.

नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीत ४ एप्रिल रोजी रात्री १:३० वाजताच्या दरम्यान सदा गँग आणि साई लाला गँगच्या दोन गटांमध्ये गंभीर स्वरूपाचे भांडण झाले. सदर भांडणामध्ये धारदार शस्त्राचा वापर होऊन अर्जितसिंघ हा जागीच ठार झाला तर हल्ला करणारे मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर मयत इसमास तसेच जखमींना तात्काळ उपचारासाठी वजिराबाद शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान जखमींपैकी मोहम्मद अरबाज याचा मृत्यू झाला तर सय्यद आवेज हा गंभीर अवस्थेत होता. त्याला पुढील उपचारासाठी त्यास विष्णूपुरी शासकीय रुग्णालय येथे रेफर करण्यात आले.

आवेजला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना रुग्णालय परिसरातच अर्जितसिंघच्या भावाने धारदार शस्त्राने त्याच्यावर पुन्हा हल्ला केल्याची अत्यंत गंभीर घटना घडली. या वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित तत्परता व दक्षता न दाखविता सदर हल्ला रोखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आली नसल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.

या प्रकरणाची पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी गांभीर्याने दखल घेऊन भाग्यनगर ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव कनिराम राठोड आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक नागेश गणपतराव वाडीयार यांना पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २५ तसेच मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून खालील पोलीस अंमलदार यांना प्राथमिक चौकशीच्या अधीन राहून निलंबित केले आहे. सदर प्रकरणी पुढील विभागीय चौकशी सुरू असून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात भाग्यनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचवेळी विष्णूपुरी शासकीय रुग्णालय येथे सुरक्षा गार्ड म्हणुन नेमण्यात आलेल्या ‘मेस्को’ कंपनीच्या प्रमुखांशी शिस्तभंगाचे कारवाई संदर्भाने चर्चा करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!