नांदेड – मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राहिलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांना मराठा आरक्षण प्रश्नावरून पुन्हा एकदा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. सोमवारी अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे लोकसभा निवडणूक प्रचारासाठी पोहोचले असता त्यांचे वाहन गावकऱ्यांनी अडवले. संतप्त युवकांच्या भावना पाहता अखेर पोलिसांच्या वाहनातून चव्हाण यांना गावातून बाहेर पडावे लागले.
भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड लोकसभेची जागा पुन्हा भाजपाकडे राखण्याची मोठी जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर आहे. विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचारासाठी अशोकराव चव्हाण हे जिल्हाभर मिळावे, सभा घेत आहेत. सोमवारी ते अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे प्रचारासाठी पोहोचले. यावेळी गावकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी सुरू केली. ‘एक मराठा, लाख मराठा’ यासह अन्य घोषणाही मराठा युवक देत होते. या युवकांनी अशोकराव चव्हाण यांचे वाहन अडवले. त्यांच्या वाहनाला गराडा घातला. अखेर पोलिसांनी त्यांना पोलीस वाहनातून गावाबाहेर काढले. संतप्त तरुणांनी चव्हाण यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना मराठा आरक्षण प्रश्नावरून जिल्ह्यात आतापर्यंत धर्माबाद, मुदखेड येथेही मराठा युवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.