
नांदेड – लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून विविध प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील वारंवार गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार तसेच लपून छपून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील २० टोळ्यांमधील ६० जणांना हद्दपार करण्यात आले असून १४ जण तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांकडून गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यासंदर्भाने ३० एमपीडीए प्रस्तावाची कारवाई सुरू आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमान्वये १७९ प्रस्तावावर हद्दपार हद्दपारची कारवाई केली जात आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी २०२३-२४ या कालावधीतील २० टोळ्यांमधील ६० जणांना नांदेड जिल्ह्याबाहेर हद्दपार केले आहे. तर १४ आरोपीताना कारागृहामध्येच स्थानबद्ध करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. अभिलेखावरील १३६ पाहिजे असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर फरारी असलेल्या १२ गुन्हेगारांनाही जेरबंद केले आहे. २०२३ मध्ये बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या ५१ जणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर २०२४ मध्ये बेकायदेशीर पिस्तूल, गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दहा जणांना अटक केली आहे.
जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, खंडेराव धरणे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशनचे प्रभारी यांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात लपून छपून अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन ८२ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. आगामी काळातही ही कारवाई सुरूच राहणार असून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध तसेच शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या असमाजिक तत्त्वाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे.