
नांदेड – देगलूर येथील वन्नाळी फाटा येथे गॅस भरताना एक चार चाकी जीप (ओमनी) जळून खाक झाली. या घटनेत जीपसह एक हॉटेल, ऑटोमोबाईल, सिमेंट दुकान तसेच एका दुचाकीसह घरालाही आगीची झळ बसली. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. घटनेत खाक झालेली चार चाकी जीप देगलूरहून वन्नाळी येथे एका इंग्रजी शाळेत मुलांची ने आण करीत असते अशी माहिती मिळाली. सुदैवाने सोमवारी गॅस भरताना या जीपमध्ये कोणीही नव्हते. त्याचवेळी जीपचालक मात्र या घटनेत गंभीररित्या भाजला असल्याची माहितीही पुढे आली आहे.
सोमवारी सायंकाळी गाडी चालक विजय हणमंत जोरगूलवार हे वन्नाळी फाटा येथे गॅस भरण्यासाठी चार चाकी घेऊन गेले होते. चार चाकीत गॅस भरत असताना अचानक चारचाकी जीपने पेट घेतला. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. या ओमनी जीपसह आजूबाजूचे दुकानेही या आगीत ओढले गेले. या घटनेत गाडी चालक विजय जोरगुलवार हे गंभीर जखमी झाले. त्यांना देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच देगलूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळानंतर त्यांना यश आले. घटनास्थळी देगलूरचे तहसीलदार भरत सूर्यवंशी, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अनेकांनी स्फोट होईल या भीतीने घटनास्थळापासून पळ काढला होता.



