
नांदेड – महापालिकेत प्रशासकीय राज संपल्यानंतर भारतीय जनता पक्ष सत्तेवर विराजमान झाला. भाजपाच्या पहिल्या महापौर कविता मुळे यांनी शहरवासीयांना विविध सेवा देण्यासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा घोषित केला आहे. या घोषणेतील विविध कामांची पूर्तता करण्यात कमी पडलेल्या नांदेड महापालिकेच्या विद्युत विभागाचे उपअभियंता सतीश निवृतीराव ढवळे यांना महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले आहे. शंभर दिवस कार्यक्रमाचा ते पहिला बळी ठरले आहेत.
उपअभियंता सतिश निवृत्तीराव ढवळे यांनी १०० दिवसाचा कृती आराखड्याचा ७० दिवसाचा कालावधी उलटूनही दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही. हे त्यांच्या निलंबनाचे प्रमुख कारण ठरले असले तरीही आणखी एक मजेशीर कारण त्यांच्या निलंबनासाठी महापालिका प्रशासनाने दिले आहे. उपअभियंता पदाच्या अधिकाऱ्याने आपले कार्यालय स्वतः बंद करून जाणे हे नांदेड महापालिकेच्या सर्वच अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे हे अपेक्षित असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ढवळे हे कार्यालयाची वेळ संपल्यानंतरही कार्यालय बंद न करता निघून जाणे व त्यांचे स्वतःच्या विभागावर नियंत्रण नसणे या कारणासाठी त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ चे कलम ४ अन्वये शिस्तभंगाची कार्यवाही करणे आवश्यक आवश्यक असल्याचे सांगत ढवळे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ चे कलम (४) पोटकलम (१) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महापालिका आयुक्तांनी तात्काळ प्रभावाने निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत.
निलंबन कालावधीत उपअभियंता सतिश ढवळे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण) अवधी, स्वियेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९७९ चे कलम ६८(१) व कलम ६९ अन्वये देय निर्वाह भत्ता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका देईल. हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत ढवळे यांना नांदेड मुख्यालयी उपस्थित रहावे लागणार आहे. पूर्व परवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे कलम १६ मधील तरतूद लक्षात घेता निलंबीत कालावधीत उपअभियंता सतिश ढवळे, उप अभियंता यांनी खाजगी नोकरी स्विकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवर्तणूक बद्दल दोषी ठरतील. तसेच अशा बाबतीत ते निर्वाह भत्यावरील आपला हक्क गमावून बसतील असेही कळविण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे दार बंद करूनच घरी जाणे महापालिकेत बंधनकारक..? उपअभियंता ढवळे यांना निलंबित करताना प्रशासनाने ढवळे हे कार्यालयीन वेळेनंतर आपले कार्यालय बंद करून गेले नाहीत असाही एक ठपका ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या कार्यालयीन व्हाट्सअप ग्रुपवर तसे छायाचित्र कोणीतरी पोस्ट केले आणि त्यानंतर त्यांच्या निलंबनाची कारवाई सुरू झाली अशी बाबही पुढे आली आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपले कार्यालय बंद केले की नाही याची खातरजमा करूनच आपले कार्यालय सोडावे लागणार आहे, अन्यथा त्यांचेही निलंबन आदेश निघतील अशी अपेक्षा आहे.



