प्रशासकीय

नांदेडमधील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय अधिष्ठातांच्या कारभाराची चौकशी होणार..!

कार्यमुक्त करून त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी, आमदार बोंढारकरांची आयुष मंत्रालयाच्या सचिवांकडे मागणी, रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यानेच अधिष्ठातांच्या गैरकारभाराविरुद्ध उठवला आहे आवाज

नांदेड- नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे तब्बल ७ वर्षापासून प्रभारी अधिष्ठाता असलेले यशवंत पाटील यांना कार्यमुक्त करून त्रयस्थ यंत्रणेमार्फत त्यांची चौकशी करावी, अशी मागणी नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर यांनी वैद्यकीय शिक्षण व आयुष मंत्रालयाचे सचिव धीरज कुमार यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. यापूर्वी आ. बोंढारकर यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अधिष्ठाता पाटील यांची चौकशी करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा सात वर्षापासून अतिरिक्त पदभार आपल्याकडेच ठेवण्यात यशस्वी झालेल्या डॉ. यशवंत राजपाल पाटील यांच्या मनमानी आणि बेकायदेशीर कृत्यांच्या तक्रारींनी मंत्रालयासह न्यायालयही गाठले. परंतु न्यायालयीन आदेशालाही न जुमानता हेकेखोरपणे कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या यशवंत पाटील यांच्याविरुद्ध रुग्णालयातील एक महिला कर्मचारी ज्योती मारुती पांचाळ यांनी आपल्यावर पदोन्नती प्रकरणी झालेल्या अन्यायाची तक्रार आ.आनंद बोंढारकर यांच्याकडे लेखी स्वरूपात केली. त्या तक्रारीवर आ.बोंढारकर यांनीही आयुष संचालनालयाच्या संचालकांकडे केली. परंतु संचालकांकडून मिळालेल्या संथ प्रतिसादामुळे आ. बोंढारकर यांनी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची व्यक्तीश: भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार नोंदवली. यावर हसन मुश्रीफ यांनी या सर्व प्रकारांची चौकशी करण्याचे आदेशित केले. ही माहिती मिळताच संबंधितांकडून नांदेड येथून सूत्रे हलवण्यात आली. परिणामी विधानसभेत प्रश्न येण्यापूर्वीच सरकारचे कार्यासन अधिकारी प्रवीण कांदे यांनी २५ फेब्रुवारी रोजी एक आदेश काढून या तक्रारींविषयी चौकशीसाठी समितीचे गठन केले.
दरम्यान, राज्याच्या आयुष संचालनालयाचे संचालक रमण घुंगराळेकर (जे स्वतः मूळचे नांदेडचे आहेत.) यांनी शासकीयरित्या नांदेडच्या आयुर्वेद महाविद्यालयाचा २७ फेब्रुवारी रोजी दौरा केला. या दौऱ्याचेही शासकीय आदेशही निर्गमित करण्यात आले होते. या दौऱ्यात घु़ंगराळेकर यांनी नक्की काय केले? याविषयीची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. एकीकडे डॉ. यशवंत पाटील यांच्या तक्रारींचा वाढता आलेख, तर दुसरीकडे शासनस्तरीय अधिकाऱ्यांकडून येनकेन प्रकारे होत असलेली त्यांची छुपी पाठराखण हा प्रकार म्हणजे”इथून तिथून सगळे सारखेच असा प्रकार असल्याचे सांगत, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळणार का? तसेच यशवंत पाटील यांच्याकडून सरकारी अर्थात जनतेच्या पैशाची होणारी बेकायदेशीर लूट थांबणार का? असा प्रश्न अन्यायग्रस्त तक्रारदार कर्मचाऱ्यांना पडला आहे.
हा सर्व घटनाक्रम पाहता नांदेडच्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नेमण्याच्या पात्रतेचा एकही  अधिकारी राज्य शासनाला गत सात वर्षात मिळालेला नाही का? तसेच सतत सात वर्ष हे पद प्रभारीपणे यशवंत पाटलांकडे ठेवण्यात शासनस्तरीय अधिकाऱ्यांचा नेमका हेतू काय? असा प्रश्न पुढे येत आहे.

माजी विद्यार्थी करणार आपल्याच गुरूंची चौकशी..! चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली ही द्विसदस्यीय समिती मुंबई येथील रा.आ.पोदार वैद्यक महाविद्यालयाच्या अधिष्ठाता श्रीमती संपदा संत यांच्या अध्यक्षतेत नेमण्यात आली आहे. यात सदस्य म्हणून बारामती येथील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता अनिल भिकाजी काळे यांचा समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे चौकशी समितीच्या अध्यक्षा श्रीमती संपदा संत आणि सदस्य अनिल काळे हे अधिष्ठाता यशवंत पाटील यांचे माजी विद्यार्थी आहेत. एकीकडे अधिष्ठाता पदावर प्रभारी यशवंत पाटील कार्यरत तर दुसरीकडे चौकशी करणारे त्यांचेच माजी विद्यार्थी. त्यामुळे ही चौकशी निष्पक्ष आणि तथ्यांवर आधारित होणार नाही असा आक्षेप ज्योती पांचाळ यांनी तक्रारीद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांच्याकडे आणि आ. आनंद बोंढारकर यांच्याकडे नोंदवला. ही तक्रार लक्षात घेऊन आ.बोंढारकर यांनी सचिव धीरज कुमार यांच्याकडे निष्पक्ष चौकशी समिती गठित करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!