राजकीय

नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने थोपटले दंड..!

महायुतीबाबत निर्णय होईल तेव्हा होईल, जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवारांकडून मागविले अर्ज

नांदेड-  जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने दंड थोपटले आहेत. महायुती होणार की नाही याचा निर्णय आता होईल तेव्हा होईल;  मात्र भाजपाने इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागून स्वबळाची तयारी सुरू केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळपास तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता इच्छुकांची भाऊ गर्दी होत आहे. त्यातून सक्षम उमेदवाराची निवड करणे हे आगामी काळात सर्वच पक्षासाठी आता एक कसोटीच ठरणार आहे.

नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने आगामी महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी  इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरून भाजपा केंद्रीय कार्यालय, नांदेड जिल्हा, नाना-नानी पार्कसमोर, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या मागे, नांदेड येथे जमा करायचा आहे.  १८ ऑक्टोबरपासून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत इच्छुकांना आपले अर्ज सादर करता येतील. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी अर्ज त्यांनी क्युआर कोडद्वारे उपलब्ध करून दिला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. याविषयी  १२ ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी जिल्ह्यातील भाजपचे सर्व पाचही आमदार भीमराव केराम, डॉ. तुषार राठोड, राजेश पवार, जितेश अंतापूरकर व श्रीजया चव्हाण तसेच नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर व नांदेड ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख उपस्थित होते. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपने एकजुटीसह पक्षसज्जतेचीही प्रचिती दिली होती. त्यानंतर आता इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवून पक्षाने एक पाऊल आणखी पुढे टाकले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!