
नांदेड – नांदेड वाघाळा महापालिकेच्या हद्दवाढीसंदर्भात मंत्रालय स्तरावर दोन बैठकांचे आयोजन करण्यात आले. मात्र या बैठका या ना त्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या. त्याचवेळी नांदेड महापालिकेलगत असलेल्या १७ गावांच्या कालबद्ध विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याबाबतही हालचाली सुरू असताना नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी ते विषय आपले नसून पावडेवाडी येथे नगरपंचायत करण्याबाबत आपली ठाम भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील या विषयावरील बेबनाव स्पष्टपणे पुढे आला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नांदेडमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आभार सभा घेण्यात आली. या आभार सभेत शिवसेना नेते तथा विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी नांदेडच्या विकासासाठी महापालिकेत आतापर्यंत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी काहीही केले नसल्याचे आरोप केला होता. त्याचवेळी नांदेडसह महापालिकेलगत असलेल्या १७ गावांच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या मागणीची तात्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर बैठकांचेही आयोजन केले होते. मात्र एक नव्हे तर दोन बैठका ऐनवेळी रद्द झाल्या. त्या कशामुळे रद्द झाल्या की कुणी दबाव टाकून रद्द केल्या याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.
या विषयाची शहरात चर्चा सुरू असतानाच आज ७ एप्रिल रोजी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी नांदेड महापालिकेत विविध प्रश्नावर बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. महेशकमार डोईफोडे यांच्यासह मनपा विभाग प्रमुख आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत शहरातील पाणीप्रश्न, स्वच्छता, वीजव्यवस्था आदींचा आमदार कल्याणकर यांनी आढावा घेतला. नांदेड महापालिकेने शहरातील पाणीपुरवठा संदर्भाने केलेल्या उपाययोजनाबाबत कल्याणकर यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीनंतर आमदार कल्याणकर यांनी मनपा आयुक्तांशी बंद दाराआडही काहीवेळ चर्चा केली.
बैठकीनंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नांदेड शहराच्या हद्दवाढीसाठी मंत्रालय स्तरावर बैठका सुरू आहेत. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता हद्दवाढ हा विषय आपला नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. स्वतंत्र प्राधिकरणाबाबतही आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी पावडेवाडी नगरपंचायतीच्या स्थापनेबाबत मात्र आपण आजही आग्रही आहोत, ते करून दाखवू आणि मगच बोलू असे त्यांनी स्पष्ट केले. पावडेवाडी नगरपंचायतीबाबत आपण आजही आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. पावडेवाडी नगरपंचायतीची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे याबाबतही त्यांना विचारणा केली. त्यावेळी नगरपंचायतीसाठी माझा पाठपुरावा सुरूच आहे, ते काम होईलच असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आमदार कल्याणकर यांची पावडेवाडी नगरपंचायतीबाबत भूमिका स्पष्ट असल्याचेच दिसून आले. मात्र त्याचवेळी नांदेड उत्तरचे आमदार कल्याणकर यांनी नांदेड महापालिका हद्दवाढीच्या विषयातून आपले अंग का काढून घेतले यावरही आता चर्चा सुरू झाली आहे. नांदेड महापालिकेत नगरसेवक राहिलेल्या आणि आता सध्या दुसऱ्या टर्मचे आमदार असलेल्या कल्याणकर यांनी त्यांच्या मतदार संघात समाविष्ट असलेल्या नांदेड महापालिकेच्या हद्दवाढीच्या विषयाला ‘ तो आपला विषय नाही’ असे म्हणणेही एक प्रकारचे आश्चर्यच ठरले आहे. त्यामुळे मंत्रालय स्तरावर सुरू असलेल्या हद्दवाढीच्या विषयावर आमदार कल्याणकर हे नेमकी काय भूमिका घेतील, याकडेही आता नांदेड शहरवासीयांचे लक्ष लागले आहे
महापालिका हद्दवाढीच्या विषयात अशोकरावांची एन्ट्रीच नाही..! राज्याचे माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांचे नांदेड महापालिकेवर एकहाती वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी हे वर्चस्व राखले आहे. आता ते भाजपात गेले आहेत. भाजपाची संपूर्ण सूत्रेही त्यांच्या हाती आली आहेत. महायुती सरकारमध्ये मोठा भाऊ म्हणून असलेल्या भाजपाने त्यांना नांदेडसह मराठवाड्याची जबाबदारी सोपवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महायुतीतील नेत्यांमध्ये वाक् युद्ध सुरू झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात न्यायालयाचा निर्णय पुढे गेल्याने ते वाक् युद्ध आता शमले आहे. मंत्रालय स्तरावर नांदेड महापालिकेच्या हद्दवाढीसंदर्भात तसेच स्वतंत्र प्राधिकरण संदर्भात बोलावलेल्या बैठकांच्या अनुषंगाने त्यांची अद्यापही प्रतिक्रिया पुढे आले नाही. या विषयाच्या बैठकीसाठी निमंत्रितांच्या यादीत पहिल्या बैठकीसाठी नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांचे नाव नव्हते. दुसऱ्या बैठकीसाठी त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. त्याचवेळी महापालिका हद्दीलगत असलेल्या १७ गावांमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातील काही गावे ही समाविष्ट आहेत. त्यामुळे या मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांचा मात्र अद्यापही या बैठकीच्या निमंत्रितांमध्ये समावेश करण्यात आला नाही. ही बाबही चर्चेची ठरली आहे. त्यामुळे भाजपा नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची या विषयातील स्पष्ट भूमिका अजूनही पुढे आली नाही. त्यामुळे त्यांची नांदेड महापालिकेच्या हद्दवाढीच्या विषयात अद्याप एन्ट्रीच झाली नसल्याचे स्पष्ट आहे.



