
नांदेड – नांदेड महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी केलेल्या आंदोलनाला अखेर शुक्रवारी सायंकाळी यश प्राप्त झाले. कर्मचाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनतर आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनीही कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता सुरू केलेल्या आंदोलनामुळे संताप व्यक्त केला होता. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागेल की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेत शुक्रवारी सायंकाळी वेतन अदा केले आहे. या निर्णयाचा महापालिका कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मनपाच्या चतुर्थ श्रेणीतील ९६४ कर्मचाऱ्यांना ३ कोटी ७ लाख रुपये शुक्रवारी सायंकाळी वेतनापोटी अदा करण्यात आले आहेत.
महापालिका मुख्यालयात शुक्रवारी दुपारी एक वाजेपासूनच तृतीय, चतुर्थ श्रेणी कर्मचारी एकत्र येण्यास प्रारंभ झाला होता या कर्मचाऱ्यांनी मार्च २०२५ चे वेतन मिळावे, अशी भूमिका घेतली होती. आगामी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कर्मचाऱ्यांना वेतन आवश्यक असल्याची ठाम भूमिका घेतली होती. यासाठी कर्मचाऱ्यांनी थेट आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या कक्षाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे महापालिकेत एकच गोंधळ उडाला. याचवेळी मुख्यालयातील विविध विभागातील कर्मचारीही या आंदोलनात थेटपणे सहभागी झाले. आयुक्त डॉ. डोईफोडे हे प्रधान सचिवांशी वेगवेगळ्या विषयावरील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये होते त्यांना या आंदोलनाबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांची मनपा कर्मचाऱ्यांनी भेट घेतली आणि आपली वेतनाची मागणी कशी योग्य आहे हे सांगितले. अतिरिक्त आयुक्त कदम यांनीही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आपण आयुक्तांशी बोलून तोडगा काढू असे स्पष्टपणे सांगितले.
व्हीसी संपताच संपताच आयुक्त थेट आपल्या दालनात आले. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या काही प्रतिनिधींना चर्चेसाठी पाचारण केले. यावेळी चर्चेदरम्यान आयुक्तांनी कोणतीही पूर्व सूचना न देता असे अचानक आंदोलन करणे चुकीचे असल्याचे सांगितले. ऐनवेळी अशी भूमिका घेणे अमान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कर्मचारी प्रतिनिधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना वेतनाची गरज असल्याची भूमिका मांडली. ही भूमिका आयुक्तांना पटवून दिली. त्यावेळी आयुक्त डोईफोडे यांनी सामंजस्याने या प्रश्नावर तोडगा काढला. मनपा वित्त विभागाला तातडीने पचारण करून या विषयावर काय करता येईल, त्याची आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मार्च २०२५ चे वेतन ऑनलाइन पद्धतीने अदा केले. चतुर्थ श्रेणीतील ९६४ कर्मचाऱ्यांना ३ कोटी ७ लाख रुपये वेतनापोटी देण्यात आले आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मनपा कर्मचाऱ्यांची भूमिका सुमेध बनसोडे, विशाल सोनकांबळे, भास्कर जोंधळे, विजय मोडक, सेवानिवृत्त कर्मचारी गणेश शिंगे यांनीही मांडली.