
नांदेड – नांदेड शहरासह संपूर्ण जिल्हाभरात उद्या १४ एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त शहरात १५८ अधिकाऱ्यांसह अडीच हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली. सोमवारी निघणाऱ्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत ४०० जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
नांदेड शहरात जवळपास २०० सार्वजनिक भीमजयंती मंडळाकडून शहरातील विविध भागातून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकीमध्ये वेगवेगळे देखावे सादर केले जाणार आहेत. या देखाव्याची तसेच मिरवणूक मार्गाची माहितीही जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेतली आहे. त्याचवेळी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे संपर्क पोलीस दलाकडे उपलब्ध असून बीटमधील पोलीस कर्मचारी या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी रविवारी सायंकाळपासूनच संपर्कात राहणार आहेत.
जिल्ह्यातील मिरवणुकीच्या बंदोबस्त अनुषंगाने पोलीस अधिकारी/अंमलदार यांची रंगीत तालीम घेवुन योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत योग्य तो बंदोबस्त देण्यात आला आहे. जिल्ह्यात २ अपर पोलीस अधीक्षक, ६ उपविभागीय अधिकारी, १५० पोलीस अधिकारी, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी, १२०० पोलीस अंमलदार, ४ दंगल नियंत्रण पथक, १४०० होमगार्ड, असा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी सर्च आणि चेकींग ऑपरेशन राबविण्यात आले रेकॉर्ड वरील हिस्ट्रीसीटर डिटेन करण्यात आले आहेत. १३ एप्रिल रोजी मासरेडचे आयोजन करून जिल्हयातील ३६ पोलीस स्टेशन अंतर्गत अवैधरित्या दारू विक्री करणारे यांचेवर १०१ गुन्हे दाखल करून ४ लाख ५१ हजार ९९२ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांनी मोटार वाहन कायदा अन्वये मोहिम राबवून फटाका बुलेट व इतर केसेस करून दोन दिवसात आठ लाखांपेक्षा जास्त दंड आकारला आहे.
भीम जयंतीनिमित्त डीजे चालक आयोजक मंडळांच्या पोलीस स्टेशन स्तरावर ३० तर उपविभाग स्तरावर १० बैठका घेण्यात आल्या. जिल्हयातील ३६ पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या. तसेच
ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन बिट स्तरावर व गाव पातळीवर पोलीस पाटील, ग्रामसंरक्षक दलाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकांच्या पूर्ण मार्गाचे ऑडीट करण्यात आले. मिरवणूक मार्गावरील वाहतूकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात आले. मिरवणुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याबाबत काळजी व दक्षता घेण्यात आली आहे. उपविभागीय व पोलीस स्टेशन स्थरावर दंगा नियंत्रण योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली असून मिरवणूक मार्गावर रूटमार्च (पथसंचलन) करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास बॅरीकेटींग करून सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती अनुषंगाने “मिशन उडान” अंतर्गत सकारात्मक दृष्टीकोनातून १८ तास सलग अभ्यास हा उपक्रम १४ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यत ठेवण्यात आलेला आहे. या उपक्रमात सहभागी व्हावे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वांनी उत्साहात साजरी करावी, मिरवणुका शांततेत काढाव्यात व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.