
नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने २०२५- २६ मध्ये १०० टक्के कर वसुली करण्यासाठी नवनवीन संकल्पना राबविण्याचा विचार केला असून महिलांच्या नावे, दिव्यांगांच्या नावे तसेच स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांची पत्नी यांच्या नावे असलेल्या मालमत्तांना बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना यांना तसेच ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरणाऱ्यांना विविध सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. १७ मार्च २०२५ रोजी घेतलेल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार ही सवलत योजना लागू करण्यात आली आहे.
नांदेड महापालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना थकबाकीसह चालू वर्षाच्या मागणी बिलाप्रमाणे संपूर्ण कराचा भरणा करणाऱ्यांना एप्रिलमध्ये कराचा भरणा केल्यास ७ टक्के, मे मध्ये भरणा केल्यास ६ टक्के आणि जून मध्ये भरणा केल्यास ५ टक्के करावर सूट दिली जाणार आहे. महिलांच्या नावे असलेल्या एका मालमत्तेस एप्रिल ते जून २५ अखेरपर्यंत कर भरल्यास १० टक्के सूट दिली जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींच्या नावे तसेच घरातील इतर दिव्यांग व्यक्ती असलेल्या फक्त एका निवासी मालमत्तेस एप्रिल ते जून अखेर १० टक्के करात सूट दिली जाणार आहे. स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांची पत्नी यांच्या फक्त एका मालमत्तेस १०० टक्के सूट दिली जाणार आहे तर शहरातील मालमत्तेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सौर ऊर्जा असणाऱ्या मालमत्ता धारकांना मनपा मालमत्ता करात ५ टक्के आणि दोन्ही बाबी असल्यास १० टक्के सलग तीन वर्ष सूट दिली जाईल.
त्याचवेळी ऑनलाइन पद्धतीने महापालिकेचा मालमत्ता कर भरल्यास एप्रिल ते जून या कालावधीत ५ आणि पुढे दोन टक्के अशी सूट दिली जाणार आहे. ऑनलाइन पेमेंटमध्ये आरटीजीएस, ऑल कार्ड, ऑनलाइन ट्रान्सफर, नेट बँकिंग, मोबाईल ॲपद्वारे भरणा करता येणार आहे. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना अंतर्गत माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नी यांना मालमत्ता करात शंभर टक्के सूट निरंतर पद्धतीने दिली जाणार आहे.
मालमत्ता धारकांना या सूट योजनेचा लाभ दिल्यास वसुली कर वसुली होण्यास चालना मिळणार आहे. त्यातून महापालिकेचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल. ज्याद्वारे मनपाच्या दैनंदिन खर्चास लागणारा निधी उपलब्ध होईल. त्यातून महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारणा होण्यास मदत होईल, असा विश्वासही महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे. शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी या वेगवेगळ्या सूट योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर विभागाचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी केले आहे.
नांदेड महापालिकेची एकूण थकबाकी २१० कोटींची, चालू वर्षाचा कर ७२ कोटी…नांदेड महापालिकेचा २०२५- २६ या वर्षाचा एकूण कर २१० कोटी रुपये थकीत आहे. त्यामध्ये ७२ कोटी ५२ लाख ५९ हजार रुपये चालू वर्षाचा मालमत्ता कर वसूल करावयाचा आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या एकूण २१० कोटींच्या थकबाकीमध्ये १०७ कोटी ४३ लाख ६३ हजार रुपये ही रक्कम थकबाकीवरील शास्तीची आहे. त्यामुळे शास्तीचा हा आकडा महापालिकेची एकूण थकबाकी वाढविणाराच ठरला आहे. महापालिकेने शास्तीवरील थकबाकीत सूट योजना घोषित केली होती त्या योजनेची आता चालू आर्थिक वर्षातही काही काळ अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्याचवेळी कर वसुलीसाठी आता महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातच विविध वर्गवारीतील मालमत्ता धारकांसाठी सूट योजना घोषित केली आहे.