
नांदेड- गेल्या अनेक वर्षांपासून एकनिष्ठेने भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे. काम करत असताना पक्षाने अनेकदा पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या होत्या. या जबाबदाऱ्या मी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. पक्षाने मला सध्या प्रदेश राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती केली आहे. पक्षाने संधी दिल्यास मी नांदेड दक्षिणमधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहे.
मागील तीस वर्षांपासून मी भारतीय जनता पार्टीत सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. सुरूवातीला वसमत शहराध्यक्ष म्हणून भाजपने माझ्यावर जबाबदारी सोपविली होती. यानंतर हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले. यानंतर व्यापारी आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदीही पक्षाने संधी दिली होती. सध्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. इतकेच नाही तर नांदेड, हिंगोली या दोन्ही जिह्यात पक्ष वाढीसाठी काम केले आहे. याचबरोबर नांदेड शहरातील महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी पुढाकार घेऊन काम केले. पक्षाचे आणि समाजकार्य करताना या कालावधीत झालेल्या आंदोलनामुळे माझ्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. पक्षाचे काम करत असताना यासोबत वीरशैव लिंगायत समाजाचेही काम मी करत आहे. त्यामुळे पक्षाने माझ्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी विचार केल्यास मी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविण्यास इच्छूक आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये मी पक्षश्रेष्ठींकडे तिकिटाची मागणी केली आहे. याबाबत पक्षाकडून माझा विचार होईल, असा विश्वास आहेच. पक्षाने संधी दिली तर आपण निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण तयारीनिशी उतरणार असल्याचेही भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य नागनाथ स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.